तानसा नदीच्या पुरात मजूर अडकले; एनडीआरएफने १६ मजुरांची केली सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:48 IST2024-07-07T15:48:29+5:302024-07-07T15:48:51+5:30
उसगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली.

तानसा नदीच्या पुरात मजूर अडकले; एनडीआरएफने १६ मजुरांची केली सुखरूप सुटका
सुनील घरत
पारोळ : शहापूर परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील तानसा नदीला आलेल्या पुरात शेतात काम करणारे मजूर अडकले असल्याची घटना शिरसाड- वज्रेश्वरी रोडवरील उसगाव येथे घडली.
उसगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. नदीला पुराच्या पाण्याचे स्वरूप आले, या पुराच्या पाण्यात शेतात गेलेले मजूर अडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार राजेश पाटील यांनी तत्काळ एनडीआरएफ व महापालिका अग्निशमन दल, महसूल विभाग व मांडवी पोलिस यांना या घटनेची माहिती दिली.
या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्याची मोहीम हाती घेतली. अडीच ते तीन तासांनी दुपारी अडीचच्या सुमारास बचाव कार्य थांबविण्यात आले. पाण्यात अडकलेल्या १६ मजुरांची सुटका केली. यामध्ये ९ महिला, ७ पुरुष, दोन लहान मुलेही आहेत.
वसई तालुक्यातील तानसा नदीला अचानक पूर आल्याने नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तानसा नदीत चांदीप येथे मुंबई-बडोदा महामार्ग बनवण्यासाठी बांध टाकला असून यामुळे तानसा नदीत पाण्याचा निचरा कमी होत असल्याने हा पूर आल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.