लुटमारीसाठी ज्वेलर्स मालकावर हल्ला प्रकरण: आरोपी पती पत्नीला नाशिकमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:56 IST2025-12-10T16:54:05+5:302025-12-10T16:56:34+5:30
वसईच्या वालीव येथील शालीमार हॉटेल समोर काळु सिंग यांच्या मालकीचे अंबिका ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे.

लुटमारीसाठी ज्वेलर्स मालकावर हल्ला प्रकरण: आरोपी पती पत्नीला नाशिकमधून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- लुटमारीच्या उद्देशाने दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानात घुसुन मालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी पती पत्नीला नाशिक येथून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
वसईच्या वालीव येथील शालीमार हॉटेल समोर काळु सिंग यांच्या मालकीचे अंबिका ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने दुकान मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम आरोपींचा शोध घेत होते.
वरिष्ठांनी सदर गंभीर गुन्ह्यात दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट चारच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवुन सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून आरोपी सोहेल शराफत खान (२३) व त्याची पत्नी फिरदोस बानो सोहेल खान या दोघांना नाशिक रोड परिसरातुन शिताफिने ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई व तपासासाठी दोन्ही आरोपींना वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सफौ मनोहर तावरे, संतोष मदने, पो.हवा शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, समिर यादव, संदिप शेरमाळे, अश्विन पाटील, विकास राजपुत, सनी सुर्यवंशी, मपोहवा/दिपाली जाधव, मसुब सचिन चौधरी यांनी केली आहे.
कर्जाच्या तणावातून आखला चोरी करण्याचा प्लॅन
आरोपी सोहेल हा तीन वर्षापूर्वी वसईच्या नवजीवन विभागात राहत होता. त्याला विभागाची माहिती होती. त्यानंतर तो उत्तर प्रदेशला गेला होता. तिथे त्याने दुकान होते पण ते चालले नाही. त्यानंतर त्याच्यावर कर्ज झाले होते. यातून निघण्यासाठी तो यू ट्यूब वरील चोरीचे व्हिडीओ बघायचा. या व्हिडीओतून चोरी करून कसे पोलिसांपासून वाचायचे याचा प्लान आखून चार दिवसांपूर्वी तो मिरा रोडला हॉटेलमध्ये राहण्यासाठी पत्नी व लहान मुलासह आला. तीन दिवस वसईत त्याने रेकी केली व अंबिका ज्वेलर्स लुटण्याचे ठरवले. मंगळवारी तो पत्नी मुला ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरले. अंगठी दाखविण्यास सांगुन लहान मुलाकरीता पाणी मागितले. कालुसिंग यांचा भाऊ पाणी आणण्यासाठी आतल्या रूममध्ये गेल्यावर आरोपीने चाकू दाखवला. कालुसिंग यांनी चोर चोर आरडाओरडा केल्यावर पोटावर, हातावर, दंडावर, पंज्यावर, गालावर, हनुवटीवर चाकुने वार केले.