३९ वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारा प्रेरणादायी भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:01 IST2025-09-25T17:00:58+5:302025-09-25T17:01:28+5:30
जागतिक आयर्नमॅन समुदायातही अभिमानाने नोंदवली जाते.

३९ वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारा प्रेरणादायी भारतीय
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- शरीर थकू शकतं, पण मन थकायला नको असे म्हणणारे आणि हे अक्षरशः जगणारे भारतीय अॅथलीट हार्दिक पाटील यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. त्यांनी नुकतीच फ्रान्समध्ये झालेली व जगभरात सर्वात आव्हानात्मक आणि प्रतिष्ठित मानल्या जाणारी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप अवघ्या १६ तास ५ मिनिटांमध्ये पार केली. त्यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे १ तास १९ मिनिटांत, १८० किलोमीटर सायकलिंग ८ तास ८ मिनिटांत , ४२.२ किलोमीटर धावणे ६ तास ४ मिनिटांत याप्रमाणे विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतील ३९ वी आयर्नमॅन स्पर्धा पार केली. हार्दिक पाटील यांनी ही कसोटी ३९ वेळा उत्तम रीतीने पार केली आहे. ही बाब केवळ भारतीय क्रीडाजगतात नव्हे, तर जागतिक आयर्नमॅन समुदायातही अभिमानाने नोंदवली जाते.
भारतासारख्या देशात ट्रायथलॉन क्रीडा अजूनही प्रसिद्धीपासून दूर आहे. अशा पार्श्वभूमीवर हार्दिक पाटील यांसारख्या खेळाडूंनी केवळ सहभागी होणंच नव्हे, तर ३९ वेळा आयर्नमॅन पूर्ण करणं हे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या कामगिरीमुळे देशातील अनेक तरुणांना या क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा मिळते आहे. या पराक्रमामुळे 'शरीर कितीही दमलं तरी मनातली आग विझता कामा नये' हा संदेश समाजात पोहचतो आहे. त्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक माणसात एक आयर्नमॅन लपलेला आहे. गरज आहे ती फक्त त्याला जागवण्याची. आज जेव्हा अनेक तरुण वेगवान यशाच्या शोधात असतात, तेव्हा हार्दिक यांचा सातत्यपूर्ण, कष्टाळू आणि लढवय्या प्रवास एक आदर्श उभा करतो.
३९ स्पर्धा पूर्ण करूनही हार्दिक थांबण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या पुढच्या उद्दिष्टांमध्ये काही विशिष्ट अॅल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धा, आयर्नमॅन कोचिंग व कार्यशाळा, आणि भारतात ट्रायथलॉन संस्कृती रुजवणं यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इव्हेंटच्या आयोजनावर पर्यावरणाचा देखील मुख्य विचार केला गेला. आयोजकांनी सस्टेनेबल पद्धती वापरल्या, ज्यामुळे या स्पर्धेने सर्क्युलर इकोनॉमीची अंमलबजावणी केली होती.
आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्सची स्पर्धा फक्त क्रीडापटूंच्या ताकदीची आणि सहनशक्तीची परीक्षा नव्हती, तर हा एक अद्वितीय अनुभव होता. जो प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला. या स्पर्धेने, विविध देशांच्या क्रीडापटूंना एकत्र आणून, चांगल्या क्रीडा मूल्यांमध्ये एकता आणि समर्पण यांना प्रोत्साहन दिले. आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपने हे सिद्ध केले की, सीमा ओलांडून, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आपल्याला कोणतीही अडचण पार करता येऊ शकते.