इनोव्हा कारचा बायपास रोडवर अपघात; वाहन थेट लग्न मंडपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:06 IST2020-06-15T15:06:00+5:302020-06-15T15:06:49+5:30
नेहमीप्रमाणे पावसाळा सुरू झाला की, या भागात वळणावर नेहमी अपघात होत असतात,

इनोव्हा कारचा बायपास रोडवर अपघात; वाहन थेट लग्न मंडपात
हुसेन मेमन
पालघर - जिल्ह्यातील जव्हार बायपास रोडवरील आय.टी.आय. समोरील वळणावर इनोव्हा कारचा अपघात होऊन वाहन थेट लग्न मंडपात जाऊन पलटी झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
नेहमीप्रमाणे पावसाळा सुरू झाला की, या भागात वळणावर नेहमी अपघात होत असतात, दरम्यान बायपास रोडवर झालेल्या इनोव्हा कार चालकाचा ताबा सुटून कार थेट तेथील रहिवाशी मातीन खान यांच्या मुलीचे लग्नासाठी बांधण्यात आलेल्या मंडपात जाऊन पलटी झाली. सुदैवाने मंडपात कोणी न्हवते म्हणून मोठा अनर्थ टळला. हे वाहन चिल्हार फाटा येथील रहिवासी जयवंत गुरोडा यांची असून त्यांच्या पत्नी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. कार गुरोडा हे स्वतः चालवीत होते, त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांची दवाखान्यात मलमपट्टी करून सोडण्यात आले. तसेच वाहनातील त्यांची पैशाने भरलेली बॅग व मोबाईल या वस्तू स्थानिक नागरिकांनी त्यांच्या ताब्यात दिल्या असून वाहन बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, बांधलेले मंडप खोलून क्रेनच्या साह्याने वाहन बाहेर काढण्यात आले होते.