भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:41 IST2025-01-24T13:40:41+5:302025-01-24T13:41:16+5:30
पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते.

प्रतिकात्मक फोटो
पालघर :- पाकिस्तानच्यातुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचांपाकिस्तानीतुरुंगात मृत्यू झाल. नवीन वर्षाची सुरुवातच अशा वाईट बातमीने झाल्यामुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानी देशाच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. मृत पावलेल्या कामगाराला २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सेक्युरिटी एजन्सीने धरपकड केली होती आणि त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली असल्याचे जेष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई ह्यांनी सांगितले.
तो भारतीय असल्याचे पण भारताने पाकिस्तानला आधीच कळवलेल होते. २००८ च्या एग्रिमेन्ट ऑन कॉन्सुलर एक्सेसच्या कलम (५) मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, "शिक्षा पूर्ण झाल्याच्या आणि राष्ट्रीयता ठरल्याच्या एका महिन्यात दुसऱ्या देशाच्या कैद्यांना सोडण्याचं आणि त्याला त्याच्या देशात पाठविण्यास दोन्ही देश सहमत आहेत." या कराराप्रमाणे तो आधीच सुटायला हवा होता. पाकिस्तानातील तुरुंगातील भारतीय कैदी आणि भारतातील त्यांच्या नातेवाईकांमध्ये पत्रव्यवहार नसल्याने ते प्रचंड तणावात जगतात.
२१६ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या मलिर जेल, कराची, येथील तुरुंगात आहेत. त्यापैकी जवळपास १७० मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. आणि त्यांची राष्ट्रीयता पण ठरली आहे. त्या सगळ्यांना पाकिस्तानने तत्काळ सोडावे अशी मागणी जतीन देसाई, पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते ह्यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.