उद्घाटन झाले पण वाड्यातील भातखरेदी केंद्रे अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:22 AM2020-11-29T00:22:51+5:302020-11-29T00:22:56+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतीक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी करण्यात आले.

The inauguration took place but the paddy procurement centers at Wadya are still closed | उद्घाटन झाले पण वाड्यातील भातखरेदी केंद्रे अद्यापही बंदच

उद्घाटन झाले पण वाड्यातील भातखरेदी केंद्रे अद्यापही बंदच

Next

वाडा : दिवाळीपूर्वी मोठा गाजावाजा करत आमदार दौलत दरोडा, आमदार सुनील भुसारा व आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आधारभूत भातखरेदी केंद्रांचे उद्घाटन केले होते. मात्र, १८ दिवस झाले तरी प्रत्यक्षात आजपर्यंत एकाही ठिकाणचे भातखरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत येथील शेतकऱ्यांवर मातीमोल भावाने आपला भात व्यापाऱ्यांना देऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. परिणामी, शेतकरी नाराज आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतीक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी करण्यात आले. यावेळी तालुक्यात अन्य सात ठिकाणी अशाच प्रकारची भातखरेदी केंद्रे उद्यापासून सुरू होतील, असे उद्घाटनप्रसंगी आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले. मात्र, नव्याने दुसरी खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीच, पण प्रत्यक्षात उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रांवरही आजपर्यंत खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. 
भातउत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला आधारभूत केंद्रांवर चांगला दर (१६६८ रुपये प्रति क्विंटल) मिळेल व दिवाळी सण आनंदात साजरा करता येईल, याच विचारात येथील शेतकरीवर्ग होता. मात्र, प्रत्यक्षात ही खरेदी केंद्रे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत भात अन्य व्यापाऱ्यांना मातीमोल भावात विकावा लागून दिवाळी साजरी करावी लागली.

दिवाळीपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून भातखरेदी केंद्रांंचे उद्घाटन केले. मात्र, ती प्रत्यक्ष सुरू न केल्याने शेतकऱ्यांना भात विकता आला नाही. आघाडी सरकारचा भोंगळ कारभार सुरू असून प्रशासनावर वचक राहिलेला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. - नंदकुमार पाटील,  जिल्हाध्यक्ष, भाजप पालघर

मी गेल्या तीन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला असून मला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन कार्यवाही करतो. -विजय गांगुर्डे, 
प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ जव्हार

Web Title: The inauguration took place but the paddy procurement centers at Wadya are still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.