अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 21:38 IST2023-11-02T21:37:35+5:302023-11-02T21:38:21+5:30
Accident: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले
- मंगेश कराळे
नालासोपारा - ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. वालीव पोलिसांनी कचरा गाडीवरील आरोपी चालकाच्या विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून तपास करत आहे.
राजावली परिसरात राहणारे राजेश शंकर मोर (३७) हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने चिंचोटीवरून राजवली येथील घरी येत होते. अग्रवाल नाक्याजवळ रेंज ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिरुपती इंडस्ट्रीच्या गेट समोर वसई विरार मनपाच्या कचरा गाडीवरील (क्रमांक एम एच ४८ सी बी ०१२०) चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने, हयगईने व वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात राजेश यांच्या पोटाचा चेंदामेंदा होऊन शरीराचे दोन तुकडे झाले. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला आहे. त्यांचे भाऊ हरेश्वर मोर (३९) यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.