विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:46 IST2018-10-21T23:45:57+5:302018-10-21T23:46:03+5:30
शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़.

विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन
विक्रमगड : या तालुक्यात व शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. सद्यस्थितीत या तालुक्यात तीनवेळेस नऊ तासांचे भारनियन चालू आहे़ त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प होत असून या भारनियमनाला कंटाळून अनेक व्यापारी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत़ तर शेती व्यवसायालाही यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेट्रीक यंत्रे निट चालत नाही व नऊ तासांचे भारनियम असल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत आहे़ त्यामुळे येथील जनता या महावितरणाच्या भारनियमनाला कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़
भाजप सरकारने निवडणूकीत संपूर्ण महाराष्टÑ भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल वीज ग्राहक विचारीत आहेत़ या भारनियमनामुळे व्यापारी वर्गाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातावर गुजराण करणा-यांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तर सध्या परिक्षा सुरू असल्याने खेडयापाड्यातील मुलांना अभ्यास करतांना दिव्याचा आसरा घ्यावा लागत आहे. तर दिवाळीही अंधारात जाणार की काय? असा सवाल केला जातो आहे़
विक्रमगड तालुक्यातील भारनियमानाचे वेळापत्रक बनवितांना स्थानिक व्यापारी वर्ग, वीज ग्राहक यांची सोय लक्षात घ्यायला हवी होती. ते न केल्याने येथील शेतकरी, बागायतदार व व्यापारीवर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे़ संध्याकाळी महावितरणने तीन तासांचे भारनियमन केले आहे़ त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरून कुणाला कोणतेही काम करता येत नाही. रस्त्यावरून वावणेही मुश्किल होऊन गेले आहे.
>या तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे आमच्या नशिबी हा अन्याय कायमचा पूजला गेला आहे़ महावितरणने भारनियमनाचे तास कमी करावे. अगर पूर्वीप्रमाणेच दोनवेळेचे भारनियमन लागू करावे़ ९ तासांचे भारनियमन तातडीने बंद करावे, अन्यथा या गावातील व्यापार, उद्योग ठप्प होईल.
- जयवंत मोतीभाई पटेल, व्यापारी, विक्रमगड