दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:10 IST2018-05-20T03:10:37+5:302018-05-20T03:10:37+5:30

संजय व संजना यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाला विरोध असल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.

Husband's wife murdered wife for not paying for liquor | दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

ठाणे : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून संजना ऊर्फ संजू संजय सोनी (२७, रा. साठेनगर, वागळे इस्टेट) या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या संजय सोनी (३६) या पतीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
व्यसनी संजयने १७ मे रोजी सकाळी ६ च्या सुमारास संजना तसेच आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, दोघींनी नकार दिल्याने त्याने संजनाशी वाद घातला. या रागातूनच त्याने संजनाच्या तोंडावर उशी दाबून नंतर पंख्याच्या वायरने गळा दाबून खून केला. सकाळी पोलिसांच्या मदतीने तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला, त्यावेळी तो घटनास्थळी हसत बसला होता.

प्रेमविवाह असूनही हत्या
संजय व संजना यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाला विरोध असल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. तर, त्याचे आईवडीलही त्यांच्यापासून वेगळे राहत होते. संजय काहीच कामधंदा करत नसल्याने ती धुणीभांडी करून कुटुंबाची गुजराण करत होती. मात्र, तरीही तो तिच्याकडे नेहमीच दारूसाठी पैसे मागत. त्यातूनच तो तिला मारहाणही करायचा. गुरुवारी पहाटेही त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने तिचा खून केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Husband's wife murdered wife for not paying for liquor