पावसामुळे हाय अलर्ट, 4 अधिकाऱ्यांसह 33 जवानांची टीम तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:21 IST2021-06-10T19:21:05+5:302021-06-10T19:21:13+5:30
भारतीय हवामान खात्याने 9 जून ते 13 जून दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला मोठी भरती येणार असल्याची शक्यता वर्तवित पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या उत्तर कोकणामध्ये अलर्ट जाहीर केला आहे.

पावसामुळे हाय अलर्ट, 4 अधिकाऱ्यांसह 33 जवानांची टीम तैनात
पालघर - उत्तर कोकणातील पालघर, ठाणेसह अन्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानंतर, पालघर जिल्ह्यात "अलर्ट" जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर 4 अधिकाऱ्यांसह 33 जवान असलेल्या एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत.
भारतीय हवामान खात्याने 9 जून ते 13 जून दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला मोठी भरती येणार असल्याची शक्यता वर्तवित पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या उत्तर कोकणामध्ये अलर्ट जाहीर केला आहे. 11 जून ते 13 जून ह्या तीन दिवसात समुद्रात साधारणपणे 4.26 मीटर्सच्यावर लाटा उसळण्याची शक्यता आहे. जिल्ह्याला 112 किमीचा समुद्र किनारा लाभला असून डहाणू तालुक्यातील झाई-बोर्डी ते वसई तालुक्यातील नायगाव दरम्यानच्या किनारपट्टीवरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. समुद्राला आलेल्या भरती सोबत मुसळधार पाऊस कोसळल्यास किनारपट्टीवरील घरांसोबत परिसरातील घरामध्ये पाणी घुसण्याचा धोका पाहता एनडीआरएफच्या दोन टीमपैकी एक टीम वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात तर दुसरी टीम उर्वरित 7 तालुक्यातील घटनांकडे लक्ष ठेवण्यासाठी मनोर येथे तैनात करण्यात आली आहे.