नालासोपाऱ्यात भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: January 5, 2016 00:50 IST2016-01-05T00:50:29+5:302016-01-05T00:50:29+5:30
नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे

नालासोपाऱ्यात भीषण पाणीटंचाई
शशी करपे, वसई
नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील लोक दिवसरात्र अक्षरश: भटकंती करीत आहेत. या टंचाईच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे या भागात पाणीविक्रीचा नवा धंदा अनेकांनी सुुरू केला असून येथील गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
नालासोपारा शहराचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने येथील लोक नागरी समस्यांनी ग्रासले आहेत. शहरात वन आणि आदिवासींच्या जागा हडप करून बेकायदा चाळी आणि झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या आहेत. नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, गवराईपाडा, बिलालपाडा, धानीवबाग यासह वसई पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली परिसर झोपडपट्ट्या आणि बेकायदा चाळीने वेढला गेला आहे. या परिसरात गोरगरीब लोकांनी हक्काची घरे विकत घेतली आहेत.
मात्र, येथील किमान लाखभर लोकसंख्या असलेला परिसर अनधिकृत असल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवणे डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यातही माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही भागांत पाणीपुरवठा केला गेला आहे. तसेच अगदी दाटीवाटीने वसलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाइपलाइन टाकणेही अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा अतिशय कमी असल्याने येथील लोकांना बाराही महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या गळक्या व्हॉल्व्हमधील पाणी भरण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतात. परिस्थिती इतकी भीषण आहे की, लोक गटारांतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी भरताना दिसतात. या भागात अनेकांनी आता पाणी विकण्याचा धंदा सुुरू केला आहे. टँकरने पाणी मागवून सिंटेक्सच्या टाकीत भरून ठेवले जाते. त्यानंतर, लोकांना वीस लीटर पाणी पाच रुपये दराने विकले जाते. पिण्यासाठी लोकांना आता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कित्येक ठिकाणी पाणीविक्रेते पाहावयास मिळतात.
सध्या वसई-विरार परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठमोठ्या इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. सध्या पाणीपुरवठा मर्यादित असल्याने पालिकेने नव्या वसाहतींना नळकनेक्शन देणे बंद केले आहे. उलट, चोरटी कनेक्शन्स शोधून ती तोडण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.
जादा पाणी मिळण्यास अजून पाच-सहा महिने लागतील. त्यानंतर, पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. पण, तोपर्यंत लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.