वाड्यातील २१ गावांत भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: May 1, 2016 02:34 IST2016-05-01T02:34:31+5:302016-05-01T02:34:31+5:30
उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत

वाड्यातील २१ गावांत भीषण पाणीटंचाई
वाडा : उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असताना देखील केवळ शासकीय अनास्थेमुळे नागरीकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
तालुक्यातून पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा तब्बल पाच बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी निसर्गाने दिली असताना शासकीय धोरणांमुळे व स्थानिक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावपाड्यांतील आदिवासींच्या घशाला ३० वर्षापासून कोरड पडली आहे. तालुक्यातील टोकरेपाडा, उज्जैनी, गावठाण, आंबेवाडी, साखरशेत, दिवेपाडा, सागमाळ, जांभूळपाडा, थावरपाडा, ओगदा, बालशेत पाडा, वरठापाडा (नाणे), वळवीपाडा (कोंढले), गाळतरे (धुसालपाडा), गुहीर, खुटल, आमगाव, अंभई, शेलटे, मुगूस्ते, साईदेवळी या गावपाड्यातील आदिवासींना घोटभर वणवण भटकावे लागत आहे. काही गावांना अनियमीत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर काही गावे प्रतिक्षेत आहेत.
पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, पाणीपुरवठ्याच्या विविध योजना, लहान मोठे बंधारे, बोअरवेल, सिंचन तलाव, विहिरी यासाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र कागदी घोडे नाचवून विहिरी व खडकावर पोखरलेल्या कोरड्या बोअरवेल या व्यतिरीक्त काही आलेले नाही. कोकाकोला कंपनीने गांध्रे येथे वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातुन थेंबभर पाण्याचीही गळती होत नाही व कंपनीला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र आमच्या गोरगरीब जनतेला मार्च महिन्यापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते व तहानेने व्याकुळ होऊन याच कंपनीने तयार केलेले मिनरल वॉटर विकव घेऊन पाणी प्यावे लागते. (वार्ताहर)
पहाटेपासून पाण्याचा शोध
तालुक्यातील अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात निघावे लागते. अनेक गावपाड्यांतील विहिरींनी नळ गाठल्याने पाच किलोमीटर दुर नदीवर डोक्यावर हांडे घेवून पायपीट करावी लागत आहे.
वाडा तालुक्यात १९६ बोअरवेल मंजुर झाल्या आहेत. मात्र त्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत असून येथील सहा गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याला डिझेल व बिल लवकर निघत नाही शिवाय प्रशासन पाणी देखील वेळेवर उपलब्ध करून देत नसल्याने या गावांना टँकर सुरू असून पाणी मिळत नसल्याची येथील आदिवासी नागरीकांनी व्यक्त केली.
या संदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता संतोष शिर्शिकर यांच्याशी संपर्क साधला असता १९६ बोअरवेल मंजुर आहेत मात्र त्यांना प्रशासकीय मंजुरी व वर्कआॅर्डर मिळालेली नाही. शिवाय सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून दोन गावे प्रतिक्षेत असल्याची माहिती त्यांनी दिली.