The fishery business in Palghar is under scrutiny | पालघरमधील मच्छीमार व्यवसाय डबघाईला

पालघरमधील मच्छीमार व्यवसाय डबघाईला

शौकत शेख 

डहाणू : वादळी वारे, अतिवृष्टी आणि मत्स्य दुष्काळ यामुळे आधीच अस्मानी संकटात सापडलेला मच्छीमार आता ओएनजीसीच्या सर्वेक्षण आणि मत्स्य दुष्काळामुळे सुलतानी संकटात सापडला असल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. थंडीच्या मोसमामुळे मत्स्य दुष्काळ असल्यामुळे मच्छीमार डोली आणि जाळीने मासेमारीकडे वळला आहे. त्यामुळे जाळ्यात येईल ते मासे पकडून उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत बोंबील आणि पापलेट मिळत असून ओल्या बोंबीलचे ४०० ते ५०० टप मुंबईला पाठवले जात आहेत. बोंबीलच्या एक टपाला ५००० असा भाव मिळत असून बोंबील उत्पादन नसल्याने बोंबील, पापलेटचा भाव वधारला आहे. दरम्यान डिसेंबर ते एप्रिल हा थंडीचा काळ मत्स्य उत्पादनासाठी ढिसाळ काळ मानला जातो. होळीनंतर मासे उत्पादनाला चांगला काळ येतो, मात्र या काळात ओएनजीसी सेसमिक आपला सर्वेक्षण सुरू करत असल्याने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी हाकलून लावल्या जात असल्याचे मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनी सांगितले. त्यामुळे आता मच्छीमारांवर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली आहे.
सागराशी झुंज देऊन रात्रंदिवस पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या चिंचणी ते झाईपर्यंतच्या मच्छिमार समुद्रात मासे सापडत नसल्याने हवालदिल झाला आहे. बोंबीलसाठी भांगाची मासेमारी केली जाते. नवमी, सप्तमी, पंचमी, अष्टमी यामध्ये बोंबील मासेमारी केली जाते. सुक्या बोंबीलसाठी डहाणू प्रसिद्ध आहे.

डिसेंबर ते एप्रिल हा मासेमारीचा ढिसाळ हंगाम असतो. होळीनंतर मासेमारी केली जाते. डालडा मासेमारी पौर्णिमा व उधाणाला मासेमारी होते. यामध्ये मासे मिळतात. नुकसान भरपाई दिलेली नाही. डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत उपजीविकेचे क्षेत्र बॅन करतात. त्यामुळे मासेमारांना मागे परतावे लागते. समुद्रात गेलेल्या बोटींना डिझेलचा खर्चही मिळत नाही. इंधन व मजुरीच्या दरात झालेली वाढ व मत्स्य उत्पादनात होणारी घट यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे.

‘मासेमारीस उपयुक्त असलेल्या सुरुवातीच्या पहिल्या हंगामात वाळत ठेवलेल्या सुकी मासळीचे वादळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच ओएनजीसीसारख्या सरकारी कंपन्यांकडून अरबी समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत होत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छीमार क्षेत्राच्या मर्यादा अटी-शर्तीच्या त्रांगड्यात अडकल्या आहेत.’ -अशोक अंभीरे, मच्छीमार नेते

Web Title: The fishery business in Palghar is under scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.