साडेतीन एकराच्या तळ्यात मत्स्यशेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 00:55 IST2020-06-26T00:55:16+5:302020-06-26T00:55:21+5:30

साडेतीन एकरमधील पडिक जमिनीत निर्माण केलेल्या शेततळ्यात छंद म्हणून मत्स्यशेती करून शहरी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी साद घातली आहे.

Fisheries in a three and a half acre pond | साडेतीन एकराच्या तळ्यात मत्स्यशेती

साडेतीन एकराच्या तळ्यात मत्स्यशेती

विरार : इच्छा आणि आवड असली की कोणतीही अविश्वसनीय गोष्ट शक्य करता येते. विरार-मनवेलपाडा येथील विनोद पाटील यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. विनोद पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या साडेतीन एकरमधील पडिक जमिनीत निर्माण केलेल्या शेततळ्यात छंद म्हणून मत्स्यशेती करून शहरी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी साद घातली आहे.
विनोद पाटील मूळचे विरार-मनवेल पाडा येथील असून दहा एक वर्षांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात शेती होत होती. मात्र, पुढे शहरीकरणाच्या रेट्यात शेतीच्या जागी इमारती उभ्या राहिल्या. या बदल्यातही काही व्यक्तींनी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न केला आहे.
विनोद पाटील यांचे वडील मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत. पण नोकरी आणि शेती अशा दोन्ही पातळीवर तेव्हा ते कसरत करत होते. त्यातही त्यांचा ओढा शेतीकडे होता. शेतीतील नावीन्य जाणून ते ही आवड जपत आहेत. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा ते यूट्यूबवरून शेतीविषयक माहिती मिळवत होते. त्यांनी आपली शेतीची आवड जपण्यासाठी विरार पूर्व डी-मार्ट परिसरात असलेल्या पडिक जमिनीत बनवलेल्या तळ्यात प्रायोगिक तत्त्वावर मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेलाइनलगत असलेले हे तळे साडेतीन एकर जागेत आहे. खाऱ्या आणि गोड्या अशा संमिश्र पाण्याचे हे तळे आहे. या तळ्यात पाटील यांनी जिताडा आणि तिलिफया या दोन जातींच्या माशांचे तीन महिन्यांपूर्वी बीज सोडले होते. या तळ्यातून सध्या त्यांना आठवड्याला दहा किलोपर्यंत मासळी मिळते.
>शेतीला व्यावसायिक जोड हवी!
शहरातील नोकरीला मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे तरुणांची पावले गावाकडे वळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तेव्हा त्यांनी शेतीतील अत्याधुनिक प्रयोगांतून आपले अस्तित्व दाखवून द्यायला हवे. आता आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती कशी करू शकतो यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला मत्स्यपालक विनोद पाटील यांनी दिला.

Web Title: Fisheries in a three and a half acre pond