ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 10:03 IST2025-11-09T09:59:19+5:302025-11-09T10:03:52+5:30
Palghar News: गुजरातमधील ओखा बंदरातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नलनारायण या ट्रॉलरमधील एक तांडेल आणि सात खलाशी अशा आठ जणांच्या बोटीसह पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी यांनी अपहरण केल्याची तक्रार ट्रॉलर मालकाचे भाऊ विष्णू नानजी भाई राठोड यांनी ओखा येथील तटरक्षक दलाकडे केली आहे.

ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
पालघर - गुजरातमधील ओखा बंदरातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नलनारायण या ट्रॉलरमधील एक तांडेल आणि सात खलाशी अशा आठ जणांच्या बोटीसह पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी यांनी अपहरण केल्याची तक्रार ट्रॉलर मालकाचे भाऊ विष्णू नानजी भाई राठोड यांनी ओखा येथील तटरक्षक दलाकडे केली आहे.
बोटीत सातपाटीचे मच्छीमार नामदेव मेहेर (६२) यांच्यासह दीव-दमणचे तांडेल मितेश रामजी (३२), भारत सिकोत्रिया (२६), तरुण बरैया (२१), करण बामनिया (२१), जुनागडचे नीलेश भाई रमेश भाई पंजारी, (२२), मोहन राणाभाई बांभनिया (४५), सामजी वरजंग (५६), असे एकूण आठ मच्छीमार होते. पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी बोर्डच्या सैनिकांनी बोटीच्या जवळ येत हवेत फायरिंग केली. त्यांनी तत्काळ बोटीवर चढून बोटीसह मच्छीमारांचे अपहरण केल्याचा दावा तक्रारदार राठोड यांनी केला आहे.
ट्रॉलरमध्ये जीपीएस यंत्रणा
आमच्या ट्रॉलरमध्ये जीपीएस सिस्टम असल्याने आमच्या ट्रॉलरने पाकिस्तान हद्दीत प्रवेश केला नसून उलट पाकिस्तानच्या मेरिटाइम मरीन सिक्युरिटी बोर्डच्या सैनिकांनी आमच्या ट्रॉलरचे आठ मच्छीमारांसह अपहरण केल्याची तक्रार विष्णू राठोड यांनी ओखा येथील कमांडिंग ऑफिसर कोस्टगार्ड, तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे. नेव्ही आणि कोस्ट गार्ड यांनी पाकिस्तानच्या मरीन सिक्युरिटी बोर्डच्या अधिकाऱ्यांशी बोलून आमच्या लोकांना सोडवण्याची विनंती केली असल्याचे सांगितले.