महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 09:22 AM2021-01-23T09:22:14+5:302021-01-23T09:23:11+5:30

वसई-विरारमध्ये चर्चा : मी तेवढा मोठा नेता नसल्याचा ठाकुरांचा दावा

ED's action against the backdrop of municipal elections? | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई?

Next

विरार : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या नावावरील विवा ग्रुपवर शुक्रवारी पहाटे सहा वाजल्यापासून ईडीने धाडसत्र टाकले आणि शहरातील वातावरण ढवळून निघाले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धाड टाकली गेली असल्याचीही चर्चा रंगू लागली. दरम्यान, यामुळे आपले नाव मोठे होणार आहे, मात्र आपण तेवढा मोठा नेता नसल्याचा दावा आ. हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

विरार परिसरात शुक्रवारी पहाटेच सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नागरिकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर शहरात एकच कुजबुज सुरू झाली. ईडीच्या पथकाने एकंदर पाच ठिकाणी धाडी टाकल्याचे समजते. पीएमसी बँकेच्या आणि मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून ईडीने या धाडी टाकल्याचेही बोलले जात आहे. बहुचर्चित पीएमसी घोटाळ्यात पाच ते सहा हजार कोटींचे मनीलॉन्ड्रिंग झाले होते. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरू झाली असल्याचे सूत्रांकडून कळते.

दरम्यान, मला काहीही माहीत नसून ते आलेले आहेत, ते चौकशी करत आहेत. स्टेशनच्या जुन्या घरी आणि कार्यालयात तपास, चौकशी ईडी करत आहे. ते माझ्याकडे आलेले नसून आमच्या परिवाराच्या नावावर असलेल्या विवामध्ये आले आहेत. नाव कशातही येऊ द्या, धनादेशद्वारे व्यवहार झालेले असून, त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.

माझ्यामागे ईडी लागायला तेवढा मी मोठा नेता नाही, पण आज आणि उद्या पेपर आणि टीव्हीला नाव आल्याने मी मोठा होणार आहे. ईडीमुळे मोठे बनण्याची नक्कीच संधी मिळते. जे काही आहे ते समोर येईल व चुकीचे केले असेल तर तेही समोर येईल.
- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, आमदार, बहुजन विकास आघाडी

Web Title: ED's action against the backdrop of municipal elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.