लोकसभेच्या तोंडावर पालघरमध्य़े शिवसेनेत धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:04 IST2019-03-07T14:04:10+5:302019-03-07T14:04:56+5:30
आयात उमेदवारांना नगरपरिषदेच्या निवडणुकीचे तिकिट दिल्याने शिवसेनेचे नगरसेवकही नाराज झाले आहेत.

लोकसभेच्या तोंडावर पालघरमध्य़े शिवसेनेत धुसफूस
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना डावलून राष्ट्रवादीतून आयत केलेल्या 10 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास वनगा यांच्यासाठी भाजपाने शिवसेनेला सोडला असताना शहरातील शिवसैनिक विरोधात जाणे सेनेला परवडणार नाही. पक्ष वाढविण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. यामुळे राष्ट्रवादीतून अनेकांनी शिवबंधन बांधले आहे.
आयात उमेदवारांना नगरपरिषदेच्या निवडणुकीचे तिकिट दिल्याने शिवसेनेचे नगरसेवकही नाराज झाले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. शहरात पक्षाची ताकद असताना राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करण्याची गरज काय, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली आहे.