धनगर समाजाचा नालासोपाऱ्यात मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:44 IST2019-10-18T01:35:16+5:302019-10-18T06:44:27+5:30
पोलीस ठाण्यात खून केल्याचे प्रकरण : कारवाईची मागणी

धनगर समाजाचा नालासोपाऱ्यात मोर्चा
नालासोपारा : सोमवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यातच घुसून रिक्षा चालक आकाश कोळेकर याचा चाकूने खून करणाºया आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करावी, या मागणीसाठी धनगर समाजाने नालासोपारा पोलीस ठाण्यावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालक जमले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
आकाशची हत्या करणाºया रवींद्र शंकर काळेल (२२) या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या घटनेचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा. ही हत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले असेल त्यालाही अटक करून शिक्षा करावी, हत्येवेळी उपस्थित असलेले अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित केले पाहिजे, अशा मागण्या घेऊन वसई -पालघर धनगर समाजाने मोर्चा काढला होता. हे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना देण्यात आले आहे. या हत्येची माहिती घेण्यासाठी कोकण परिक्षेत्राचे आयजी निकेत कौशिक आणि पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सोमवारी रात्री उशीरा नालासोपारा पोलीस ठाण्याला भेट दिली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून योग्य त्या कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.