धरणांच्या गावांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:48 IST2018-03-30T01:48:58+5:302018-03-30T01:48:58+5:30
मुंबईत पाण्याची उधळपट्टी होत असतांना या महानगरीला पाणी पुरवठा करणारा पालघर

धरणांच्या गावांची पाण्यासाठी वणवण
विक्रमगड : मुंबईत पाण्याची उधळपट्टी होत असतांना या महानगरीला पाणी पुरवठा करणारा पालघर जिल्हयाचा ग्रामीण भाग व याचा ग्रामीण तालुक्यातील स्थानिक मात्र घोटभर पाण्यासाठी असुसला आहेत. मात्र या कडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही धामणी व कवडास धरण विक्रमगड तालुक्यात आहेत मात्र, त्याचा एक थेंबही येथील स्थानिकांना मिळत नाही. तलवाडा, धामणी, कवडास व आता देहेर्जे प्रकल्प साकारत आहे. मात्र, या बुडीत क्षेत्र असलेल्या सावा व धरण परीसरातील लोकांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागत आहे.
येथील नागरीकांना मैलंमैल पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अनेक वेळा स्थानिकांना या धरणांचे पाणी मिळावे या करीता सत्ता नसतांनाही दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी आंदोलने केली होती. पाणी परिषदा घेतल्या मात्र, आत भाजपाची सत्ता असतांनाही आदिवासी विकास मंत्रीपद असुनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे त्यावेळी केलेली आंदोलने फार्स होती का असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, या लोकांना न्याय मिळावा या करीता निलेश सांबरे यांनी कोकण विकास मंचांच्या नेतृत्वाखाली येत्या ५ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे़
विक्रमगड तालुक्यातील आदिवासी व शेतकरी वर्गाच्या सर्र्वांगीन विकासासाठी आदिवासी उपाययोजनेतून धामणी व कवडास ही धरणे उभारण्यात आली आहेत. ती फक्त विक्रमगड तालुक्यात आहेत. मात्र त्याची पाणी प्रत्यक्षात शेतीसाठी कमी व औद्योगिक क्षेत्रसाठी राखिव ठेवून वसई-विरार या भागांना पुरविले जात आहे तसेच, मुंबई व इतर शहरी भागासाठी आरक्षित करुन शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पूसली आहेत. हे पाणी पळविण्याचा हा घाटच आहे़ सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाणी शेतीला पुरविण्यासाठी शेवटच्या टोकापर्यत पाणी उपलब्ध करुन न देता अन्यत्र वळवून येथील स्थानिक आदिवासींवर अन्याय केला जात असल्याचा आरोप होत आहे़ तर नुकतेच पालघर येथे सुर्या पाणी बचत संघर्ष समितीतर्फे बेमुदत उपाषण देखील करण्यांत आले होते़