इंधन दरवाढविरोधात निदर्शने
By Admin | Updated: May 29, 2017 05:39 IST2017-05-29T05:39:23+5:302017-05-29T05:39:23+5:30
वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व

इंधन दरवाढविरोधात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व पाणी टंचाइच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारवर हल्ला बोल करत निदर्शन केली.
मोखाडा तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व पालघर जिल्हा अध्यक्ष केदार काळे यांनी केले. यावेळी मोखाडा शहर अध्यक्ष जमशेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार, मोखाडा तालुका अध्यक्ष अशोक पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात, मोदी सरकारने शेतकऱ्यांना तूर उत्पादन करण्याचे आवाहन करुन सरकार तूर विकत घेईल अशी हमी दिली होती. परंतु, सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असून अपमानही केला आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.
निदर्शनांना प्रतिसाद
देशात सर्वत्र पेट्रोलचे दर कमी झाले असतांना महाराष्ट्रात मात्र ते वाढविले गेले आहेत. याला काँग्रेसचा विरोध आहे. वारसा हक्काने मिळालेल्या मालमतेवर तीन टक्के दराने लावले जाणारे मुद्रांक शुल्क अन्यायकारक आहे. ते तात्काळ मागे घ्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निदर्शनांना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.