डहाणूतील तलावात कमळांच्या संख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:15 IST2019-10-23T01:18:45+5:302019-10-23T06:15:54+5:30
तलावातील प्रदूषण वाढल्याचे संकेत; कमळांचे अस्तित्व धोक्यात?

डहाणूतील तलावात कमळांच्या संख्येत घट
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील तलावांमध्ये पाण्यावर वाढणाऱ्या शेवाळ प्रवर्गातील वनस्पतींचा थर वाढल्याने त्याचा फटका कमळाच्या फुलांना बसतो आहे. त्यांच्या फुलण्यावर याचा परिणाम होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दरम्यान, शेवाळ्यामुळे तलाव जरी हिरवागार दिसत असला तरी आगामी काळात येथील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यातील शहरी भागात डहाणू नगर परिषदेच्या अखत्यारीत पारनाका येथील तलावाचा समावेश होतो. या तलावातील कमळ फुलांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडत होती. येथील विविध रंगांच्या कमळ फुलांची पर्यटकांना भुरळ पडत होती. मात्र, काही वर्षांपासून तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर गटारातील पाणी देखील येऊन त्यात मिसळत होते. नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे याची तक्रार केली. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे या तलावातील शेवाळ्याची वाढ होऊन पाण्याचा पृष्ठभाग अक्षरश: झाकला गेला.
सूर्यप्रकाश तळापर्यंत जाण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळेच कमळांवर परिणाम होऊन त्याचा धक्का या कमळांना बसून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय परिसंस्थेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. या शेवाळ्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता तपासणे आवश्यक असून अन्यथा ऐन टंचाई काळात पाण्याचे प्रमाण घटण्याचे तसेच दूषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील तलावही शेवाळ्याच्या विळख्यात सापडले आहेत. येथे जनावरांच्या पाणवठ्याची भिस्त तलावाच्या पाण्यावरच आहे. यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याने अनेक तलावांच्या पाणी पातळीत वाढ होऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा झाला. हे शेवाळ अन्य जलस्त्रोत आणि शेतांमध्ये पोहचल्यास त्याचा धोका पिकांनाही होऊ शकतो.
कमळाच्या दोन प्रजाती
कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. कमळ फुलाच्या लाल आणि उपल्या अशा दोन जाती आहेत. लाल कमळाची पाने गुळगुळीत खाली लवदार, देठ लाल नारंगी रंगाचा असून सप्टेंबर ते आॅक्टोबर हा त्याचा फुलण्याचा कालावधी आहे. तर उपल्या कमळाची पाने वर्तुळाकार, तळाशी अरुंद खंडित भाग असतो. पानाच्या खालच्या बाजूस किरमिजी रंगाचे ठिपके असतात. निळी, जांभळी, गुलाबी व पांढरी इ. रंगाचीफुले असतात.