वसईत लिफ्टमध्ये अडकून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:10 AM2019-01-06T08:10:26+5:302019-01-06T08:10:40+5:30

डायस रेसिडन्सीमधील प्रकार : लिफ्ट दुरुस्त न केल्याने घडली घटना

Death of a seven year old child stuck in Vasaiyat lift | वसईत लिफ्टमध्ये अडकून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू

वसईत लिफ्टमध्ये अडकून सात वर्षांच्या बालकाचा मृत्यू

Next

वसई : वसई पूर्व येथे शनिवारी सकाळी सात मजली टॉवरच्या लिफ्टमध्ये अडकून एका बालकाचा मृत्यू झाला. वालीव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सातिवली येथे डायस रेसिडन्सी हा सात मजली टॉवर आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट नं. १०४ मध्ये संदीप गौड राहतात. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांचा पुत्र अंशकुमार हा भाऊ ईशानकुमार व शेजारी राहणारा सर्वन चौबे या मित्रासोबत सोसायटी परिसरात खेळायला गेला होता. खेळून झाल्यावर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचे दार उघडून आत जात असताना अचानक लिफ्ट सुरू झाली. लिफ्ट व भिंत यामधील मोकळ्या जागेत अंशकुमार अडकला गेला. या वेळी भांबावलेल्या ईशानकुमार व सर्वनने मदतीसाठी आरडाओरडा केला. सोसायटीतील रहिवाशांनी धावाधाव करीत लिफ्टच्या मोकळ्या जागेत अडकलेल्या अंशकुमारला बाहेर काढले. मात्र डोके व पोट पूर्णपणे चेपले गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अंशकुमार याचे आजोबा रामहित गौड यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अंशकुमार न्यू लाइफ एज्युकेशनच्या शाळेत सिनीयर केजीत शिकत होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप दिवटे करीत आहेत.

विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
डायस रेसिडन्सीची लिफ्ट काही दिवसांपासून बिघडलेली होती. मात्र सहा वर्षे झाली तरी सोसायटी बनविली गेली नव्हती. याबाबत हा टॉवर बांधणाऱ्या डायस ब्रदर्स या विकासकांना वारंवार सांगूनही लिफ्ट दुरुस्त केली गेली नव्हती. विकासकही रहिवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करीत होता. अनेकदा लिफ्टमध्ये रहिवासी अडकले की, इतर लोक लिफ्टचे दार उघडण्यासाठी सळईचा वापर करीत होते. डायस ब्रदर्स दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: Death of a seven year old child stuck in Vasaiyat lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.