डहाणू नगरपरिषद सापडली आर्थिक संकटात

By Admin | Updated: January 18, 2016 01:50 IST2016-01-18T01:50:19+5:302016-01-18T01:50:19+5:30

डहाणू नगरपरिषदेच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने गेल्या पाच, सहा महिने उलटूनही नगरपरिषद हद्दीत काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइट

Dahanu municipality found financial crisis | डहाणू नगरपरिषद सापडली आर्थिक संकटात

डहाणू नगरपरिषद सापडली आर्थिक संकटात

शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणू नगरपरिषदेच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने गेल्या पाच, सहा महिने उलटूनही नगरपरिषद हद्दीत काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइट देखभाल दुरुस्ती, सफाई कामगार तसेच रस्ते गटारे व शौचालय आदी विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांना वेळोवेळी बिले अदा केली जात नसल्याने त्यांच्यात संताप व्यक्त केला जात असून येत्या आठ दिवसांत थकीत बिले अदा न केल्यास शहरात साफसफाई करण्याचे कामबंद करण्याचा इशारा घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने दिला आहे.
६० हजार लोकवस्ती असलेल्या डहाणू नगरपरिषद हद्दीत एकूण १८ हजार मालमत्ताधारक आहेत. येथे दररोज दहा ते बारा टन घनकचरा जमा होत असतो. त्यामुळे या क्षेत्रातील निर्माण होणारा घनकचरा घंटागाडीद्वारे संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे तीनचाकी सायकली, पुरेशा प्रमाणात कामगार तसेच वाहने नसल्याने हे काम दरवर्षी ठेका पद्धतीने दिले जाते. त्यासाठी नगरपरिषदेला दरमहा साडेसहा लाख रुपये देण्याचा करार आहे. यासाठी शासन डहाणू नगरपरिषदेला १४ व्या वित्त आयोगातून अनुदान प्राप्त होत असते. परंतु, शासनाचे हे अनुदान वेळेवर मिळावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पाठपुरावा करणे गरजेचे असतानाही संबंधित विभाग याकडे काणाडोळा करीत असल्याने अनेक महिने अनुदान मिळत नाही. विशेष म्हणजे अनुदानाला विलंब झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने नगरपरिषद प्रशासनाच्या जनरल फंडातून ती रक्कम देण्याची तरतूद आहे. परंतु, प्रशासन चालढकल करीत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापनाला बिले अदा न केल्याने सफाई काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साफसफाईचे काम थांबणार आहे. दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या या नगरपालिकेमार्फत शहरात नियोजनाशिवाय बेधडक विकासकामे हाती घेतली जातात. त्यामुळे ठेकेदारांना बिलांसाठी नगरपालिका कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

Web Title: Dahanu municipality found financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.