मंगेश कराळे
नालासोपारा:- अनोळखी महिलेच्या खूनाचा अवघ्या आठ तासात छडा लावण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.
विरार पुर्व येथील नरेश पाटील यांच्या वाडीत एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची माहिती मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी धाव घेवून रणवरे यांनी माहिती घेतली असता, सदर महिला भंगार गोळा करण्यासाठी या ठिकाणी नेहमी येत असल्याची आणि ती फुलपाडा परिसरात राहत असल्याबाबतची माहिती मिळाली. तिच्या राहत्या ठिकाणी गेल्यावर सखू भोईर (५०) असे तिचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिचे पती शांताराम भोईर, मुलगा अंकुश, मुलगी पुजा आणि सुन दिपाली यांच्याकडे याप्रकरणी चौकशी केली असता, या सर्वांच्या जबाबात तफावत दिसून आली.
त्यानुसार गुन्हे शाखेने पती शांतारामची उलट तपासणी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. सखूचे शिवा सहाणी याच्याशी अनैतिक संबध असल्याने त्यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी सखू घरी न परतल्याने तिचा शोध घेत नरेश पाटील यांच्या वाडीत गेलो असता सखू त्या ठिकाणी झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला घरी परतण्याचा आग्रह केला असता तिने नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. त्यातून सखूच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन केल्याचे शांतारामने कबुल केले. त्यानुसार सखूची मुलगी पुजाने दिलेल्या तक्रारी वरुन विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवून तिच्या खुन्याला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे यांनी केली आहे.