CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमधील कोरोना रुग्णांची हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:48 IST2020-05-22T00:41:38+5:302020-05-22T00:48:34+5:30
रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमधील कोरोना रुग्णांची हेळसांड
- प्रतीक ठाकूर
विरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नालासोपारातील कोरोनाबाधितांचे दीड शतक, विरार शहराचे शतक तर वसई शतकाच्या उंबरठ्यावर अशी स्थिती आहे. रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असताना महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सुरक्षारक्षकांना सांगून पालिकेबाहेर काढल्याचा गंभीर आरोप एका नगरसेविकेने केला आहे.
नालासोपारा येथील रिद्धिविनायक हॉस्पिटल व विरार येथील म्हाडाच्या विलगीकरण सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रिटा सरवैया यांनी या तक्रारी आयुक्तांच्या कानावर घातल्या. मात्र आयुक्तांनी या तक्रारींना काय आधार आहे, असा प्रश्न केला. खासगी रुग्ण आणि पालिकेने दाखल केलेल्या रुग्णांत भेदभाव होत असल्याचे सरवैया यांनी सांगितले. म्हाडातील विलगीकरण सेंटरमध्येही अशीच अवस्था असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी सरवैया यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सरवैया यांनी केला असता, संतापलेल्या आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना बोलावून सरवैया यांना बाहेर काढण्यास सांगितले. यासंदर्भात आयुक्तांची बाजू घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
वसई-विरार शहरांत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहर ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कठीण काळात आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत; त्यांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. म्हाडा येथील विलगीकरण सेंटरमध्ये जेवण-पाणी मिळत नाही. त्यांच्या तक्रारी, म्हणणे ऐकून घेणे हे प्रशासनाचे काम आहे. आयुक्तांनी लोकप्रतिनिधींचा अपमान करणे योग्य नाही. मी या आयुक्तांविरुद्ध तक्रार करणार आहे.
- रीटा सरवैया, नगरसेविका