CoronaVirus News : प्रसिद्ध यात्रोत्सवांवर कोरोनाबाधेचे विघ्न!, विक्रेते-व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:43 IST2021-04-13T23:36:51+5:302021-04-13T23:43:46+5:30
CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तसेच त्यामुळे मृत्युदरही वाढत असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवांवर यंदाही गदा येणार आहे.

CoronaVirus News : प्रसिद्ध यात्रोत्सवांवर कोरोनाबाधेचे विघ्न!, विक्रेते-व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
विरार : वसई-विरारमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा वसईकरांवर पुन्हा लॉकडाऊनचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लग्नसमारंभ साधेपणाने साजरे करण्याचे, तसेच आठवडा बाजार, मानवी संचारावर रात्री बंदी आल्याने नागरिकांना पुन्हा घरात अडकून पडावे लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तसेच त्यामुळे मृत्युदरही वाढत असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवांवर यंदाही गदा येणार आहे.
एप्रिल व मे महिन्यांत वसई तालुक्यात श्री हनुमान जयंती, गुढीपाडवा, श्री रामनवमी यासारख्या उत्सवांच्या निमित्ताने मोठे यात्रोत्सव भरविले जातात. या यात्रोत्सवांना वसई तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी होते. तसेच या यात्रोत्सवांमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली वसईतील प्रसिद्ध यात्रोत्सव साधेपणाने साजरे झाले होते. यंदाही कोरोनाने डोके वर काढल्याने महत्त्वाचे यात्रोत्सव साधेपणाने साजरे होण्याची चिन्हे आहेत. जवळ येऊन ठेपलेल्या यात्रोत्सवांना शासनाकडून परवानगी नसल्याने ग्रामस्थ तथा देवस्थान कमिटीकडून शास्त्रोक्त पूजा करून यात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात्रेत दरवर्षी रेलचेल असणारे आकाशपाळणे, खेळण्यांची दुकाने लावणारे, मिठाई व्यावसायिक यांची यात्रोत्सव नसल्याने उपासमार होणार असून बच्चे कंपनीचा देखील हिरमोड झाला आहे.
प्रसिद्ध यात्रा-उत्सव
१४ एप्रिलला गुढीपाडवा, २१ एप्रिल रोजी श्रीराम नवमी, २७ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती, ३० एप्रिल रोजी जुचंद्र येथील प्रसिद्ध चंडिकादेवीचा यात्रोत्सव तसेच पुढे मे महिन्यात तुंगारेश्वर पर्वतावरील यात्रोत्सव, वज्रेश्वरी येथील यात्रोत्सव होणार होते, मात्र वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने यात्रांना खीळ बसणार आहे.