पोस्टात ठणाणा; एटीएम कोरडी, सर्वत्र बोंबाबोंब!
By Admin | Updated: November 12, 2016 06:23 IST2016-11-12T06:23:43+5:302016-11-12T06:23:43+5:30
शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती

पोस्टात ठणाणा; एटीएम कोरडी, सर्वत्र बोंबाबोंब!
शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती. सराफांनी जुन्या नोटा घेऊन अव्वाच्या सव्वा दराने सोने विक्री केल्याने त्यांची चांदी झाली. परंतु रोजंदारी आणि आठवडी तत्वावर ज्यांना मजुरी अथवा पगार दिला जातो व ज्यांचे पोट हातावर असते त्यांचा खिसा मात्र कोरडाच राहिला. आता आठवडाभर खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. रांगेत उभे असलेल्यांपैकी निम्म्याच व्यक्तींना पैसे मिळाल्याने बाकीच्यांवर दिवसही फुकट गेला आणि पैसेही मिळाले नाहीत म्हणून जळफळाट करण्याची वेळ आली. बाजारपेठात सर्वत्र शुकशुकाटच होता. असेच चित्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात होते.
शशी करपे, वसई
वसई विरार नालासोपाऱ्यात नव्या नोटा मिळवण्यासाठी दुसऱ्यादिवशीही सकाळपासूनची ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी बंद असलेली एटीएम दुपारी सुरु होती. येथील पोस्टात दुसऱ्या दिवशीही रक्कम दिली गेली नाही. जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिका कार्यालयांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी रांगा लागल्या. सायंकाळी ६.३० पर्यंत ४ कोटींहून अधिक घरपट्टी केवळ शुक्रवारी जमा झाली होती. पेट्रोलपंपांवर मात्र ग्राहकांची अडवणूक होत होती.
पहाटेपासूनच बँकांच्या दाराजवळ नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. विरार आणि वसईमधील अनेक बँकांमधील रोकड दुपारी दोन वाजता संपल्याने लोक ताटकळत उभे होते. तालुक्यातील बहुतेक एटीएम मशीन्स आजही बंद होत्या. काही एटीएम मशीन दुपारपासून सुुरु करण्यात आल्या होत्या.
सर्वसामान्यांचा पगार दहा तारखेपर्यंत होतो. हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही १० तारखेलाच पगार किंवा खर्ची दिली जाते. त्यानंतर विज बिल, वाण्याचे बिल, घराचे मेटेंनन्स, दुधवाला, पेपरवाला,लाँन्ड्रीवाला,मोलकरीण,यांची बिले वा पगार चुकता केला जातो. मात्र ही बिले चुकते करण्यासाठी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. ८ तारखेला मध्यरात्रीपासून मोदी सरकारने पाचशेच्या आणि हजाराच्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यामुळे ९ तारखेपासून कोणीही या नोटा घेण्याचे कटाक्षाने टाळले. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका सुरवातीला मात्र, सर्वसामान्यांनाच बसू लागला आहे.
पगारातून आलेल्या पाचशेच्या किंवा हजाराच्या नोटा सर्वांची देणी फेडण्यासाठी सोप्या ठरतात.याच नोटावर बंदी घातल्यामुळे कोणाचीही देणी न फेडता, त्या बदलून स्वखर्चासाठी शंभराच्या नोटा घेण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून किंवा आॅफिसला दांडी मारून रांगा लावण्यासाठी पाळी हजारो लोकांवर आली आहे. त्यातच महावितरणाने पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विजेचे बिले हजारो ग्राहकांना मुदतील भरता आले नाही. महापालिकेनेही हीच नकार घंटा काल वाजवल्यामुळे मालमत्ता कर न भरताच नागरिकांना परतावे लागत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महावितरणला जुन्या नोटा घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वसईतील वीज बिल भरणा केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. महापालिकेनेही शुक्रवारी जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी एका दिवसात दुपारपर्यंत करापोटी पालिकेच्या तिजोरीत तीन कोटीहून अधिक रुपये जमा झाले होते.
दरम्यान, सुट्टेच नसल्यामुळे दैनंदीन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची मोठी अडचण नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. तर याच कारणास्तव ग्राहक फिरकत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची दुकानेही ओस पडली आहेत.
बंदी घातलेल्या नोटा वापरून सोने खरेदी करण्याची शक्कल लढवण्यात आल्यामुळे सराफांनी सोन्याच्या किंमतीत वाढ करून संधी साधली. तर सुट्टे नसल्याचे कारण देवून पेट्रोलपंप चालकांनी किमान पाचशेचे पेट्रोल भरण्याची सक्ती केली.