डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:58 AM2019-11-16T00:58:19+5:302019-11-16T00:58:23+5:30

वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले

Complete the water plan by December, otherwise legal action | डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

डिसेंबरअखेरपर्यंत पाणी योजना पूर्ण करा, अन्यथा कायदेशीर कारवाई

Next

वाडा : वाडा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कुडूस ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपासून रखडले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदाराला दिले आहेत. ही योजना रखडल्याने नागरिकांना मुबलक तसेच शुद्ध पाणी मिळत नाही. या रखडलेल्या पाणी योजनेवर चर्चा करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एल. लंबाते यांनी गुरुवारी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांची एक बैठक बोलावली होती.
या रखडलेल्या योजनेवर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांनी जिल्हा परिषदेत अनेकदा आवाज उठवला. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी एम.एल.लंबाते यांनी त्याची दखल घेऊन यावर चर्चा करण्यासाठी कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार यांची एक बैठक बोलावून पाणी योजनेचे काम का रखडले याची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही योजना तीन वर्ष रखडल्याचा आरोप करून पाणी योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर कार्यकारी अभियंता लंबाते यांनी पाणी योजना तत्काळ होणे महत्त्वाचे असून, यापुढे होणारी कामे ही चाचणी करूनच शासनाच्या नियमाप्रमाणे करणे ठेकेदाराला बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले. काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही लंबाते यांनी संबंधित ठेकेदार संदेश बुटाला यांना दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके, माजी उपसभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.एस.कुलकर्णी, शाखा अभियंता निलेश पाटील आदी उपस्थित होते.
>तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कामगारांनी कुडूस हे केंद्र मानून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. आजमितीस या गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजार आहे. पूर्वी असलेली नळ पाणी पुरवठा ही गावाला पाणी पुरवण्यास असमर्थ ठरल्याने २०१३ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कुडूससाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर विहीर, पाण्याच्या टाक्या असे काम करण्यात आले. मात्र उर्वरित कामे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत झाली नाहीत. तीन वर्षांपासून या योजनेचे काम रखडले ते आतापर्यंत. मुख्य आणि अंतर्गत पाईपलाईन, जलशुध्दीकरण यंत्र अशी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

Web Title: Complete the water plan by December, otherwise legal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.