कोरोनाच्या सावटाखाली वसई धर्मप्रांतात नाताळचा ख्रिस्त आगमन काळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 19:18 IST2020-12-06T19:17:35+5:302020-12-06T19:18:00+5:30
वसईतील विविध चर्चमध्ये पहिल्या रविवारी जांभळ्या रंगाच्या मेणबत्तीचे प्रज्वलन

कोरोनाच्या सावटाखाली वसई धर्मप्रांतात नाताळचा ख्रिस्त आगमन काळ सुरू
-आशिष राणे
वसई: नाताळाच्या ख्रिस्त आगमनाच्या काळाला यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवार पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईतील चर्चेमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर व नियमांच्या चौकटीत जांभळ्या मेणबत्तींचे विधिवत प्रज्वलन करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक मिस्सा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 25 डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून येशूख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश ख्रिस्तमंदिरांतून दिला जातो. त्यानंतर 24 डिसेंबरच्या मध्यरात्री प्रभू येशूजन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्तजन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी आगमन काळाला सुरुवात झाली असून वसईच्या विविध चर्चेसमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
पहिली मेणबत्ती- जांभळी
ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. प्रभू येशूख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जाते. येशूजन्माच्या 700 वर्षे आधी यशया या संदेष्ट्याने येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते.
नाताळनिमित्त ख्रिस्तमंदिरांत मेणबत्ती प्रज्वलनाचा संबंध पुरातन काळी साजरा केल्या जाणाऱ्या सूर्याच्या सणाशी आहे. तर उत्तरायण सुरू होणार, नवनिर्मितीसाठी पानगळती होते इत्यादींचे प्रतीक म्हणूनही मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येते. मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देत असते तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आणि ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे.
सामूहिक मिस्सा रद्द, ख्रिस्तप्रसाद चर्चच्या बाहेर
ख्रिस्ती धर्मात सामूहिक मिस्सा (प्रार्थना) केली जाते. मात्र सध्या करोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असल्याने सामूहिक मिस्सा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती वसईचे धर्मगुरू फादर मॉन्सेनिअर कोरिया यांनी दिली. ठरावीक भाविकांच्या उपस्थितीत मिस्सा करण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळे चर्चमध्ये देण्यात येणारा ख्रिस्तप्रसाद चर्चमध्ये दिला जात असला तरी मात्र भाविकानी तो स्वीकारून चर्चच्या बाहेर जाऊन घ्यायचा आहे,यासोबतच चर्चमध्ये प्रार्थना करताना सामाजिक अंतर व गर्दी न करण्याचे आवाहनही धर्मगुरूंनी यावेळी स्पष्ट केलं.