नाताळ उत्साहाची जिंगल बेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:46 PM2019-12-24T23:46:49+5:302019-12-24T23:47:18+5:30

सण ऐक्याचा, बंधुभावाचा : प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी सजली वसई नगरी

Christmas jingle bell! | नाताळ उत्साहाची जिंगल बेल!

नाताळ उत्साहाची जिंगल बेल!

Next

आशीष राणे

वसई : जगभरासह भारतात नाताळ सणाचा आनंद ओसंडून वाहत असून वसई धर्मप्रांतातही नाताळ उत्साहाची जिंंगल बेल किणकिणू लागली आहे. रस्त्या-रस्त्यांवर सांताक्लॉजच्या टोप्या, रेनडिअरची शिंगे दिसायला लागली आहेत. वसईच्या शहरी व ग्रामीण भागातील बहुसंख्य ख्रिस्ती धर्मीयांना सामावून घेतलेली शेजोळ व गावठाणे पुरती सजली असून प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी नगरी सजली आहे.
वसई हे ऐतिहासिक, तितकेच धार्मिक शहर व गावदेखील असून येथे प्रत्येक सर्वधर्मीय सणासाठी ते सजत आले आहे. गणेशोत्सव असो की दिवाळी किंवा रमजान असो, वसई अगदी झळाळून उठतेच. मात्र या बहुधर्मी, बहुभाषिक वसईसारख्या ख्रिस्ती प्राबल्य धर्मप्रांत असलेल्या शहरामध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. वसईच्या पश्चिम पट्ट्याच्या अनेक गावांत ख्रिस्ती समुदाय मोठ्या संख्येने आहे. त्यात वसई गाव, नालासोपारा आणि विरारमधील अर्नाळा आदी ठिकाणी नाताळचा पारंपरिक रंग पाहायला मिळतो. अगदी बेकऱ्यांमधून खास नाताळ विशेष केकचे सुगंध घरोघरी दरवळू लागतात. ख्रिस्ती समाजातील घराघरांमध्ये नाताळचे प्रतिबिंब जसे उमटते, तसे परिसरामध्येही उमटते. जागोजागी प्रभू येशूच्या जन्माचे देखावे सजू लागतात. घरांवर चांदण्यांचे कंदील सजतात. ही आमची दिवाळी म्हणत मित्र-मैत्रिणींना घरी फराळासाठी निमंत्रणे जातात. तसा कोणताही सण हा सामाजिक ऐक्य जपतो, बंधुभावाची भावना निर्माण करतो, म्हणूनच त्याचे महत्त्व अधिक असते आणि वसई त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

वसईच्या पश्चिम पट्टीतील टुमदार घरे, समुद्र किनारी वसलेली गावे, पाडे आणि जुन्या वसई गावातील छोट्या-मोठ्या गल्ल्या नाताळसाठी सजल्या आहेत. घराघरांवर रोषणाई करण्यात आली आहे. शहरी भागात डोकावले तर वसई स्टेला, चुळणे भागात राहणाºया ख्रिस्ती धर्मियांपैकी अनेक जण गोव्याचे आहेत, असे सांगण्यात येते. फराळाच्या अनेक पदार्थांमध्ये हिंदू-ख्रिस्ती या दोन्ही संस्कृतींचा मेळ दिसतो. नाताळात करंजी, शंकरपाळ्यांसारखे पदार्थही केले जातात. तसेच कुकीज आणि केक तर अत्यंत महत्त्वाचे. त्याशिवाय नाताळ पूर्णच होऊ शकत नाही.
नाताळच्या मध्यरात्री चर्चमध्ये कॅरोल्स गायली जातात. तसेच विविध परिसरांमधील तरुण मुले गिटारवर ही नाताळची गाणी वाजवत फिरतात. या गाणाºया मुलांसोबत काही वेळा सांताही फिरतो. गावातील बायका पारंपरिक पद्धतीने साड्या-लुगडी नेसतात आणि हा सण साजरा करतात.
दरम्या, वसईमध्येही ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात असून परदेशात असलेले किंवा बोटीवर नोकरी करणारे हे ख्रिस्ती बांधव नाताळच्या सणासाठी घरी येऊन घरच्यांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करतात. या काळात लग्नसोहळ्यांचे प्रमाणही अधिक असते. खासकरून रविवारीच वसईतील अनेक गावांमध्ये लग्न सोहळे रंगतात. त्यामुळे नाताळ आणि लग्न असा दुहेरी आनंद या परिसरातील लोक अगदी आपसूकच घेतात.

घरोघरी चांदणी
वसईतील गावागावात ६५ हजाराहून अधिक ख्रिस्ती धर्मीय राहतात. या प्रत्येक घरामध्ये चांदणी टांगलेली असते. येशूचा जन्म झाला तेव्हा तारा प्रकट झाला. या ताºयाने राजांना गोठ्यापर्यंत यायला मार्गदर्शन केले. त्यानंतर बाळ येशूला भेट प्रदान करण्यात आली. त्या ताºयाचे प्रतीक म्हणून घराघरांमध्ये हा चांदणीचा कंदील लावण्यात येतो. इथेही केकसोबत गोड पदार्थांपैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नेवरी किंवा करंजी हाही मेजवानीचा महत्त्वाचा हिस्सा असतो.

Web Title: Christmas jingle bell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.