लॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:24 AM2020-05-27T01:24:33+5:302020-05-27T06:41:56+5:30

कोरोनामुळे झाली निर्यात ठप्प; प्रक्रिया उद्योगासह अन्य फळलागवडीचा हवा पर्याय

Chiku growers lose Rs 70 crore due to lockdown | लॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड

लॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील।

बोर्डी : डहाणू आणि तलासरी या तालुक्यात सुमारे दहा हजार एकरवर चिकू लागवड केली जाते. येथील चिकूला प्रचंड मागणी असते. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे चिकू निर्यात ठप्प झाली असून बागायतदारांचे सुमारे ७० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज रुरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक प्रभाकर सावे यांनी वर्तवला आहे.

चिकू प्रक्रिया उद्योग व्यवस्था असती, तर हे आर्थिक नुकसान काही प्रमाणात टाळता आले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जून २०१९ पासून चिकू फळावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गतवर्षी पावसाचा कालावधी लांबला, चक्रीवादळामुळेही चिकूचे नुकसान झाले. नेहमी रमजान महिन्यात चिकूचा बाजारभाव हा सरासरी प्रतिकिलो २५ रुपये असतो. या वेळी कोरोनामुळे केवळ १० ते १५ टक्के मालाची विक्री आणि तीदेखील कमी दराने झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. तर निर्यातीअभावी झाडावरील पक्व फळांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.

पालघर जिल्ह्यात या फळासाठी प्रक्रिया उद्योग नसल्याने फळांची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. दीड वर्षापूर्वी तत्कालीन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘चिकू क्लस्टर-समूह’ गठित केला. या समूहातर्फे मोठे चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या आवाहनाला बागायतदारांचा प्रतिसाद लाभला होता. परंतु, त्यांच्या बदलीनंतर याकडे दुर्लक्ष झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. शेतकºयांना स्वत:च्या बागायतीत चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी तिचे बिगर शेतीमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र नियमांचा हवाला देऊन महसूल विभागाकडून अपेक्षित सहकार्य नसल्याचा ठपका स्थानिकांकडून ठेवला जात आहे.

अल्कोहोलिक ब्रेव्हरेज आणि इतर मद्य पदार्थ बनवण्यासाठी काही उत्पादकांनी तयारी दर्शवली. मात्र मद्यावर २० टक्के वॅट रक्कम आगाऊ जमा करण्याची अट असल्याने हे भांडवल उभारणे बागायतदारांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास या कोरोना काळात आर्थिक नुकसानीचे प्रमाण हे कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. हे येथील प्रमुख फळ असल्याने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

यंदा चिकूसह आंबा, लिची आदीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुन्या फळझाडांचे व्यवस्थापन करून तेथे टप्प्याटप्प्याने नवीन झाडांची लागवड करणे, नवीन फळांच्या जातीची झाडे लावण्याचा प्रयोग करणे गरजेचे आहे. याकरिता प्रशिक्षण व संशोधन यंत्रणा स्थानिक पातळीवर उभारणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबरीने समूह शेती- बागायतीचे प्रयोग करणे तसेच प्रक्रिया समूह निर्माण झाल्यास चिकूला होणाºया आर्थिक संकटावर मात करता येईल. - कृषिभूषण यज्ञेश सावे (चिकू बागायतदार)

Web Title: Chiku growers lose Rs 70 crore due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.