मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल; ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:40 IST2021-01-30T00:40:09+5:302021-01-30T00:40:28+5:30
प्रश्न सुटण्याची अपेक्षा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून, त्यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्कप्रमुख आ. फाटक यांनी कोचाळे येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली.

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल; ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
मोखाडा : येथील बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जलाशयाच्या प्रवेशद्वारावर २३ जानेवारीला ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी नुकतीच प्रकल्पग्रस्तांची कोचाळे येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी तुमची भेट घडवून आणणार असल्याचे सांगितले.
मध्य वैतरणा धरण प्रकल्पग्रस्तांनी अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना, महापालिकेने गावे दत्तक घ्यावी, प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाची वीज मोफत मिळावी, प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत, जलविद्युत प्रकल्पाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी धरणाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते.
त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून, त्यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्कप्रमुख आ. फाटक यांनी कोचाळे येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, तालुकाप्रमुख अमोल पाटील, देवराम कडू, गोपाळ ठोंबरे, भाऊराव ठोंबरे, सरपंच, उपसरपंच, प्रकल्पग्रस्त व स्थानिक उपस्थित होते.