जव्हार येथे जगदंबा उत्सव (बोहाडा) उत्साहात साजरा
By Admin | Updated: May 3, 2016 00:31 IST2016-05-03T00:31:04+5:302016-05-03T00:31:04+5:30
शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच

जव्हार येथे जगदंबा उत्सव (बोहाडा) उत्साहात साजरा
- हुसेन मेमन, जव्हार
शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच धर्मिक नाळ असलेला हा उत्सव राज्याच्या प्रत्येक आदिवासीबहुल भागात साजरा केला जातो. पालघर हा आदिवासी जिल्हाच असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ९९ टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यांत विविध गावपाड्यांत सुद्धा जगदंबा उत्सव आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला, परंपरा, व संस्कृतीचे शेकडो वर्षांची परंपरा जपली जाते.
दरवर्षीप्रमाणे जव्हार शहरात २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जगदंबा उत्सव साजरा केला गेला. रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो. विविध देवदेवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपारिक वाद्य सांबळच्या तालावर एका विशिष्टि पद्धतीने ही सोंग नाचविली जातात. या वेळी अनेक लोक आपले गाऱ्हाणे मांडत असतात. कार्यकर्ते हातात काठीला कापड बांधून तयार केलल्या टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यंत नाचविली जातात. देवदेवतांचे युद्ध, हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंगे हे बोहाड्याचे प्रमुख आकर्षण असते.
जव्हार येथील जगदंबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी गजाननाचे विधिवत पूजन करून व मिरवणूक अर्थात थाप रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत, दुसऱ्यादिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी १ मे या महाराष्ट्रदिनी मोठा बोहाडा रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तर दि. २ मे रोजी देवीची महापूजा सकाळ ९ वाजता होऊन त्यानंतर शहरातून महिषासूर व देवीचे युद्ध, मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली. या जगदंबा देवीला आरती ओवाळून, नारळ फोडून तसेच बोललेला नवस फेडून देवीच्या सोंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.
दि. १ मे रोजी रात्री ९ वाजेपासून गणपती, शारदा, मारूती, नारदमुनी, कमलादेवी, सटवाई, एकादशी, महादेव, विष्णू, वाघ, पवनदेव, ब्रम्हदेव, कृष्ण, साई, अग्नीदेव, भैरोबा, खंडेराय, भस्मासूर, राम-लक्ष्मण, हेडींबा, रावण, नरसिंह, चंद्रदेव, सूर्यदेव, महीषासूर आदी २८ प्रकारची सोंगे सकाळी ९ वाजेपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर श्री जगदंबा व महिषासूर यांचे युद्ध होऊन महिषासूराचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणूक निघाली.