मीरारोड- भाईंदरच्या तत्कालीन टेम्बा आरोग्य केंद्रात १९८३ साली जन्म झाल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा २००७ सालच्या बनावट दाखल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात एका ४० वर्षीय महिले विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मीरारोडच्या पार्श्व नगर भागातील चंदन क्लासिक इमारतीत जोसना रवी मुल्ला ( वय वर्षे ४०) ह्या राहतात. नया नगर पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी जोसना यांच्यावर बनावट जन्म दाखला प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पासपोर्टच्या अनुषंगाने चौकशीत जोसना कडे मीरा भाईंदर महापालिकेचा २००७ सालचा जन्म दाखला सापडला. सदर जन्म दाखल्यात जोसना हीचा जन्म हा १९८३ साली टेम्बा रुग्णालयात झाल्याचे नमूद केले आहे. या शिवाय तिच्या कडे पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील पंचबेरिया येथे जन्म झाल्याचा ब्लॉक बगधाहचा सुद्धा जन्म दाखला सापडला.
नया नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, बांगलादेशी असल्याच्या संशयावरून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन जन्म दाखल्यांचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेचा दाखला हा पालिकेत पडताळणी साठी दिला आहे. तर पश्चिम बंगालच्या दाखल्याची पण पडताळणी करणार आहोत.
सदर महिले कडे चौकशी केली असता तिने तिची आई हि बांग्लादेशी व वडील भारतातील असून १९७० च्या दशकात ते मीरा भाईंदर परिसरात आले होते. १९८३ साली तिचा जन्म हा टेम्बा रुग्णालयात झाला. तिचे वडील सोडून गेले तर तिची आई आणि भाऊ हे ५ ते ७ वर्षां पूर्वी बांग्लादेशात गेले आहेत. जोसना हिने भारतातील व्यक्तीशी लग्न करून तिला तीन मुली असून त्या पदवीधर होऊन नोकरी करतात असे तिने सांगितल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे.