बोईसरला २०० बेडचे रुग्णालय निर्माण करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 00:38 IST2020-08-27T00:37:06+5:302020-08-27T00:38:10+5:30
सदरच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून संपूर्ण सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

बोईसरला २०० बेडचे रुग्णालय निर्माण करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रांमध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये २०० बेड डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.
याचबरोबर कांबळगाव ता. पालघर येथील कोविड केअर सेंटरचे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालय बोईसर येथील संपूर्ण ४० बेड आयसीयू करण्यात यावे, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यालाच अनुसरून जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत प्रांताधिकारी, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य वसई, उपायुक्त कामगार बोईसर, उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बोईसर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर -१ व २ तसेच विराज प्रोफाइल प्रा. लि. टाटा स्टील प्रा. लि., जेएसडब्ल्यू प्रा.लि., लुपिन लिमिटेड बोईसर, निआॅन फाउंडेशन पालघर, आरती ड्रग्स कंपनी, अध्यक्ष, तारापूर औद्योगिक व्यवस्थापन असोसिएशन (टिमा) इत्यादी सहभागी झाले होते.
सदरच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून संपूर्ण सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणाºया अॅम्ब्युलन्स रु ग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी शिंदे यांनी केली.