वसई खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:06 AM2020-11-20T01:06:25+5:302020-11-20T01:06:43+5:30

१५३ वर्षे जुना : विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती.

British-era bridges over Vasai Bay begin to fall | वसई खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात

वसई खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भाईंदर  : नायगाव आणि भाईंदर दरम्यानच्या वसई खाडीवर रेल्वे सेवेसाठी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला १५३ वर्षे जुना पूल रेल्वे प्रशासनाने तोडण्यास घेतला आहे. मंगळवारपासून पुलाच्या तोडकामास सुरुवात झाली आहे.


विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती. त्यासाठी नायगाव ते भाईंदर स्थानकादरम्यान असलेल्या वसई खाडीवर ब्रिटिशांनी खोल खाडीत हा पूल उभारला होता. पण हा पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासनाने १९८९ च्या दरम्यान काँक्रिटचा नवा पूल खाडीवर बांधला. तेव्हापासून जुन्या पुलावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरू करावा, अशी मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. रेल्वे बंद झाली तरी पाणजू बेटावरील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या जुन्या पुलाचा वापर काही वर्षे करीत होते. पण रेल्वे प्रशासनाने आता पूल तोडण्याचे कंत्राट देऊन कामही सुरू केले आहे.


विरार ते बॉम्बे बॅकबे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकाची नावेही नाला, बेसिन, पंजे, बोरवला, पहाडी, अंडारू, सांताक्रुज, बंडोरा, माहिम, दादुर, ग्रांट रोड अशा प्रकारची होती. नंतर या स्थानकांची नावे बदलण्यात आली. १८ व्या शतकातील हा पूल रेल्वे चालवण्यास बंद केल्यानंतरही ताठ मानेने उभा होता. काही भागात त्याची पडझड झाली होती. पण खाऱ्या पाण्यात व खाडीच्या लाटांना अंगावर झेलत १५३ वर्षे या पुलाने काढली. रेल्वेने पूल तोडण्यासाठी लिलाव केला. सध्या नायगाव आणि पाणजू दरम्यानच्या पुलाचा लिलाव झाल्याने कंत्राटदाराने हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे. खांबाला हात न लावता गॅस कटरच्या मदतीने तोडण्याचे काम सुरू आहे. भाईंदरकडच्या पुलाचा लिलाव बाकी आहे.

शिसे, तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर
nजाणकार सांगतात की, या पुलाच्या पाण्यात उभ्या असलेल्या खांबात काम करताना शिसे, तांबे मोठ्या प्रमाणात ओतण्यात आले होते.
nआज त्या काळातील या शुद्ध धातूंची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणार आहे. काही पिढ्यांचा साक्षीदार व आधारवड असा हा पूल तुटताना पाहून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: British-era bridges over Vasai Bay begin to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.