लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर/सफाळे : तालुक्यातील पालघर-मनोर रस्त्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात १०८ रुग्णवाहिकेत सुमित्रा पाटील (२६) या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे भर पावसातून या महिलेला घेऊन रुग्णवाहिका जात होती; मात्र, तिच्या प्रसूतीकळा वाढल्याने आणि पावसात रुग्णालय गाठण्यास वेळ लागू शकतो हे लक्षात घेत रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला थांबून सुखरूप प्रसूती केली.
तामसई येथे राहणाऱ्या सुमित्रा यांना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल आला. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. रुकसाना शेख यांना सोबत घेऊन रुग्णवाहिका मनोर रस्त्यावर आली.
तामसई-मनोर रस्ता हा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने बंद होता. त्यामुळे चालकाने रुग्णवाहिका मासवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने पुढे नेली. ती दोन-चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या महिलेला अधिक प्रसूतीकळा जाणवल्या. त्यामुळे चालक सचिन भोईर यांना गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याच्या सूचना डॉक्टर शेख यांनी दिल्या.
प्रसूतीची वेळ आल्याने डॉक्टर शेख यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली. सुमित्रा हिने पहाटे २:३० मिनिटांनी एका गोंड्स बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन २.७३० ग्रॅम असल्याची माहिती डॉ. शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.