मौजमजेसाठी २७ लाखांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:59 IST2023-04-20T15:58:38+5:302023-04-20T15:59:00+5:30
तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई

मौजमजेसाठी २७ लाखांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
मंगेश कराळे
नालासोपारा : सोन्याच्या दुकानातून मौजमजेसाठी २७ लाखांच्या ऐवजची चोरी करणाऱ्या आरोपीला एक माहिन्यांनंतर तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
तुळींज रोड येथील गंगोत्री गोकुळ टॉवर येथे राहणाऱ्या लक्ष्मीलाल केशरीमल जैन (४९) यांची आरोपी महावीर उर्फ सनी भवरलाल जैन यांनी ३ मे २०२२ ते ६ मार्च २०२३ दरम्यान होलसेल सोने विक्रीच्या भागीदारीत व्यवसाय करू असे सांगत ३ किलो ४०० ग्रॅम वजनाचे सोने असा १ कोटी ८० लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे घेतली होती.
तसेच त्यांचा भाऊ नेमीचंद जैन, राजेश जैन व नितीन जैन यांच्याकडून ३० लाख रुपये आरटीजीएसने ऑनलाईन घेतले होते. भागीदारीत केशरीमल जैन यांचा मुलगा हितेश याला सोबत न घेता एकूण २ कोटी १० लाख रुपयांची त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी १८ मार्चला तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता. त्यानंतर आरोपी महावीर जैन याने वसई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता. तुळींज पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी वसई न्यायालयाच्या बाहेरून आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांनी आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने तीन किलो सोने नव्हे तर २७ लाखांचा ऐवज लंपास करून सर्व पैसे मौजमजेसाठी खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे.