एक वर्षांपासून फरार आरोपीस अटक, पत्नीच्या प्रियकराला चाकू भोसकून होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 16:56 IST2023-11-24T16:55:44+5:302023-11-24T16:56:32+5:30
वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती श्रवणकुमार मोर्या फरार होता.

एक वर्षांपासून फरार आरोपीस अटक, पत्नीच्या प्रियकराला चाकू भोसकून होता फरार
नालासोपारा (मंगेश कराळे) :- पत्नीच्या प्रियकराला चाकू भोसकून मागील एक वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
गौराईपाडा येथे राहणाऱ्या शैलेंद्र सिंग (२८) याला संगीता हिच्यासोबत फोनवर बोलत असताना १३ सप्टेंबर २०२२ सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तिचे पती श्रवणकुमार मोर्या यांनी दोघांचे प्रेम असल्याचा राग मनात धरून शैलेंद्र यांच्या पोटात दोन वेळा चाकूने भोसकले. वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती श्रवणकुमार मोर्या फरार होता. वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.
वालीवचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी श्रवणकुमार मोर्या (३६) हा बिलालपाडा येथे येणार असल्याची माहीती मिळाली. सदर माहितीच्या आधारे बिलालपाडा परिसरात सापळा रचून पाळत ठेवली. आरोपी त्या ठिकाणी आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो मागील १ वर्षापासुन मिर्झापुर, उत्तर प्रदेश व जोगेश्वरी याठिकाणी जागा बदलुन इतर ठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, अभिजीत गढरी यांनी केली आहे.