महावितरणचे तब्बल ३२ हजार मीटर नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:34 IST2019-11-17T22:34:48+5:302019-11-17T22:34:57+5:30
यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान

महावितरणचे तब्बल ३२ हजार मीटर नादुरूस्त
विरार : वसई - विरार शहरात यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील अनेक परिसरातील महावितरणचे वीज मीटर खराब अवस्थेत पडले होते.
वास्तविक, महापालिकेने पावसाचा कालावधी लोटल्यानंतर हे मीटर दुरु स्त करणे गरजेचे असतानाही महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बल ३२ हजार मीटर धारकांना मागील बिलाच्या आधारावर चालू बिले द्यावी लागत आहेत, त्यामुळे महावितरण तोट्यात चालली आहे.
वसई - विरारच्या महावितरण क्षेत्रांतर्गत ८ लाख ९० हजार मीटरधारक ग्राहक आहे. महावितरणाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार तब्बल ४३ हजार मीटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळले. यातील ११ हजार मीटर दुरुस्त करण्यात आले असले तरी अद्याप ३२ हजार मीटर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मीटर बंद असणे, बिलावर युनिट न दाखवणे, ग्राहकांना जास्तीची देयके येणे अशा मीटरचा समावेश आहे.
पावसामुळे रखडले काम
पावसामुळे आलेल्या तांत्रिक अडचणींनी मीटर खराब झाले होते. मात्र आता काम हे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे, असे वसईचे महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. नवीन मीटर बसवण्यासाठीचा खोळंबा झाला असून नागरिकांना त्यासाठी खेटे घालावे लागत आहेत.