युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:44 IST2025-08-08T11:43:56+5:302025-08-08T11:44:16+5:30
पालघर : अल्बानिया (युरोप) येथे अडकलेल्या पालघरच्या उमेश किशन धोडी यांची कामानिमित्त तेथे जाऊन फसवणूक झाली. उमेश यांनी सोशल ...

युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र
पालघर : अल्बानिया (युरोप) येथे अडकलेल्या पालघरच्या उमेश किशन धोडी यांची कामानिमित्त तेथे जाऊन फसवणूक झाली. उमेश यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्राकडे केलेल्या मदतीच्या हाकेला पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. खासदारांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्याची मागणी केली.
पालघरचे रहिवासी उमेश धोडी हे अल्बानिया (युरोप) येथे नोकरीनिमित्त गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे त्वरित मदतीची मागणी केली आहे. उमेश धोडी यांना वडोदरा येथील एका एजंटमार्फत ‘जनरल हेल्पर’ म्हणून अल्बानियात नोकरीचे आमिष दाखवून पाठवले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यावर जबरदस्तीने झाडू मारणे आणि अन्य मेहनतीची कामे लादली गेली. त्यानंतर कोणतीही वैध कारणे न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
जिवे मारण्याची धमकी
सध्या त्याला अन्न, निवास आणि वैद्यकीय मदतीसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधून सांगितले. दिवसेंदिवस त्याची स्थिती गंभीर हाेत असून अल्बानियातील स्थानिक एजंट हे उमेश धोडी याला जिवे मारण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सवरा यांनी सरकारला मदतीसाठी साकडे घातले आहे.