टँकरखाली चिरडून मुलाचा मृत्यू तर एक तरुण जखमी; नालासोपाऱ्यातील दुर्देवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 16:59 IST2022-08-23T16:59:26+5:302022-08-23T16:59:41+5:30
संतोष भवनच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पाणी वाहतूक करणाऱ्या भरधांव टँकरच्या खाली त्यांची दुचाकी आल्याने अनिलकुमार या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे

टँकरखाली चिरडून मुलाचा मृत्यू तर एक तरुण जखमी; नालासोपाऱ्यातील दुर्देवी घटना
मंगेश कराळे
नालासोपारा- संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी टँकरखाली चिरडून एका अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. ही घटना घडल्यावर स्थानिकांनी टँकर चालकाला मारहाण करून तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ओस्तवाल नगरीच्या साई निवास चाळीत राहणारा अनिलकुमार राम मनोरथ (१७) आणि त्याचा मित्र राहुल पन्नालाल चव्हाण (१९) हे दोघे दुचाकीवरून जात होते. संतोष भवनच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पाणी वाहतूक करणाऱ्या भरधांव टँकरच्या खाली त्यांची दुचाकी आल्याने अनिलकुमार या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे तर त्याच्या पाठी बसलेला मित्र राहुल जखमी झाला आहे. वाहतूक कोंडी असल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने आणून टँकरला कट मारताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी लोकमतला सांगितले. संतप्त स्थानिक नागरिकांनी टँकर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुळींज पोलीस अपघाती गुन्ह्याची नोंद करत पुढील तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला सांगितले.