५४ बालके कुपोषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: January 9, 2016 01:55 IST2016-01-09T01:55:45+5:302016-01-09T01:55:45+5:30
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून गावाची ओळख असणाऱ्या वावर-वांगणी येथे सन-१९९२-९३ मध्ये कुपोषणाने जवळपास ५१ बालकांचा मृत्यू झाला होता.

५४ बालके कुपोषणाच्या विळख्यात
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून गावाची ओळख असणाऱ्या वावर-वांगणी येथे सन-१९९२-९३ मध्ये कुपोषणाने जवळपास ५१ बालकांचा मृत्यू झाला होता. तर, शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकले होते. मात्र, आजही येथील कुपोषणाचा विळखा कायम असून तीव्र कुपोषित बालके ३१ व अतितीव्र कुपोषित बालके २३ अशी एकूण ५४ बालकेही या गावात कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प-१ व बालविकास सेवा योजना प्रकल्प साखरशेत-२ असे जव्हार तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प असून साखरशेत-२ या प्रकल्पात वावर-वांगणी हे गाव मोडत आहे. तर, शासनाच्या आकडेवारीनुसार साखरशेत बालविकास प्रकल्पात तीव्र कुपोषित बालके ४८३ व अतितीव्र बालके ७७ अशी एकूण- ५६० बालके कुपोषित आहेत. सन-२०१५ मध्ये गेल्या वर्षभरात १ ते ६ वर्षे वयातील एकूण-१३ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, यामध्ये ५ बालकांचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाल्याची आकडेवारी आहे. उर्वरित बालकांचा मृत्यू हा वेगवेगळ्या कारणाने झाला आहे.
अजूनही एसटी नाही...
जव्हारहून वावर-वांगणी हे गाव ३५ किमी असून या गावपाड्यांना जाण्यासाठी दोन बाजूने रस्ते आहेत. मात्र, तेही अपूर्ण व खराब तसेच व्यवस्थितरीत्या रस्त्यांची सोय नसल्याने येथे एसटी बस जात नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मिळाली तर खाजगी जीपने जावे लागत आहे. एसटी बस गाठण्यासाठी दापटी येथे ८ किमी डोंगरदरी चढून बस गाठावी लागत आहे.
आदिवासी पाडे अंधारातच...
वावर-वांगणी गावांपैकी रिठीपाडा, सरोळीपाडा, पाचभूड, गोंडपाडा, ताडाचापाडा यांना अद्यापही विद्युत पोहोचलीच नाही. त्यामुळे या पाड्यातील कुटुंबे आजही अंधारातच चाचपडत आहेत. लाइटची सोय नसल्याने येथील जि.प. शाळा व आश्रमशाळेतील मुलांची गैरसोय होत आहे. दिवाबत्तीचा आधार घेत अभ्यास करावा लागत आहे.
या भागात आदिवासी विकास विभागाची एक आश्रमशाळा तर रयत शिक्षण संस्थेची वावर येथे एक शाळा आहे. अशा इ. १ ली ते १० वीपर्यंत या भागात दोन शाळा आहेत. परंतु, येथे शिक्षकवर्गाची कमतरता आहे. जि.प. शाळा प्रत्येक पाड्यात आहेत. येथील जिल्हा परिषद शाळा एका शिक्षकावर चालत आहेत. शिक्षणाचीही मोठी गंभीर समस्या आहे. तर, रोजगार हमीची कामे व मुबलक प्रमाणात रोजगार मिळत नसल्याने डोक्यावर गाठोडे बांधून स्थलांतर करावे लागत आहे.
पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांचा अभाव
जव्हार वावर-वांगणी हे गाव ग्रुपग्रामपंचायत असून त्यात १२ पाडे व ३ महसूल गावे आहेत. या गावात एकूण १००२ आदिवासी कुटुंबे राहत असून ग्रामपंचायतीची लोकसंख्या ४ हजार २०० आहे. हे गाव पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक असून लगत गुजरात, दादरा नगर हवेली या राज्यांच्या सरहद्दीवर ही आदिवासी लोकवस्ती राहत आहेत. या गावाजवळच वाघ नदीचे पात्र असूनही येथे नळपाणीयोजना नाही. आजही डोक्यावर हंडे घेऊन नदीकाठी जावे लागत आहे. तर सागपाणा, रिठीपाडा या पाड्यांवर एप्रिल, मे महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागत आहे. वावर-वांगणी गावात उपकेंद्र आहे. परंतु, येथे डॉक्टर व नर्सची कमतरता आहे. त्यामुळे आजही या वावर-वांगणी भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.