भाईंदरमध्ये सदनिकेचा भाग कोसळून दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST2018-07-23T14:40:08+5:302018-07-23T14:43:59+5:30
महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती

भाईंदरमध्ये सदनिकेचा भाग कोसळून दोन जण जखमी
मीरारोड - भाईंदर पश्चिमेकडील बावन जिनालय जवळील ४० वर्ष जून्या इमारतीच्या एका सदनिकेचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी ( 22 जुलै) रात्री नवपार्श्वनगर - १ या इमारतीच्या सदनिकेचा भाग कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत. तर शुक्रवारी महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती. मात्र रहिवासी अजूनही इमारत रिकामी करण्यास तयार नसल्याने अडचण झाली आहे.
रविवारी रात्री ९ च्या सुमारास नवपार्श्वनगर क्र. १ या इमारतीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सदनिका क्रमांक १०८ च्या बाल्कनीचा भाग कोसळला. जितेन गंगर हे सदनिकेत कुटुंबासह राहतात. जितेन हे देखील स्लॅबसह खाली पडल्याने त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. तर एक जण खाली उभा असल्याने त्याच्या अंगावर काही भाग पडल्याने तो देखील किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी आले. महापौर डिंपल मेहता, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, माजी महापौर गीता जैन, नगरसेवक रवी व्यास आदीनी पाहणी केली. सदर सदनिका रिकामी करण्यात आली आहे.
या इमारतीत ३२ सदनिका व २२ दुकाने आहेत. भाजपाचे उत्तन मंडळ महासचिव शैलेश म्हामुणकर यांनीच सदर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार महापालिकेस केली होती. म्हामुणकर यांच्या तक्रारीनुसार पालिकेने १९ जुलै रोजी इमारतीची पाहणी केली होती. तर २० जुलै रोजीच महापालिकेने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. इमारतीस भेगा पडल्या असून आतील सळई गंजल्या आहेत. १०४ क्र. च्या सदनिकेच्या गॅलेरीस पण मोठ्या भेगा गेल्याचे म्हटले होते. तर इमारतीची संरचनात्मक तपासणी करून त्याचा अहवाल २९ जुलै पर्यंत सादर करण्यास कळवले होते. इतकेच नव्हे तर या दरम्यान अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यास त्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी दिला होता.
दरम्यान इमारतीतील रहिवाशी मात्र इमारत दुरुस्ती करून घेऊ असा पवित्रा घेऊन आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला असून इमारतीचा भाग किंवा इमारत कोसळल्यास मनुष्यहानी वा जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर काही लोकप्रतिनिधींनी राजकीय हस्तक्षेप सुरु केल्याने पालिकेची देखील कोंडी झाली आहे .