सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:32 IST2025-11-19T11:16:02+5:302025-11-19T11:32:56+5:30

मामाने भाचीला लोकलमधून ढकलून दिल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं.

16 year old niece murdered by her uncle after being pushed from a moving local train | सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या

सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या

Mumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नात्याला काळिमा फासणारी आणि मन हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन भाचीला तिच्याच सख्ख्या मामाने धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार नायगाव आणि भाईंदर स्थानकांच्या रेल्वे रुळांवर घडला. इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहिला आणि आरोपी मामाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह १७ नोव्हेंबर रोजी नायगाव-भाईंदर रेल्वे मार्गावरील रुळांवर आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या २४ तासांत धक्कादायक सत्य समोर आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामा अर्जुन सोनी (वय २०) हा चर्चगेट-विरार लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात भाची कोमलसोबत प्रवास करत होता. ट्रेन नायगाव स्टेशनच्या दिशेने जात असताना, दोघेही दरवाजाजवळ उभे होते. याच संधीचा फायदा घेऊन अर्जुन सोनीने कोमलला पाठीमागून जोरदार धक्का दिला. धावत्या लोकल ट्रेनमधून खाली कोसळल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

हे भयंकर कृत्य पाहून डब्यात उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी तातडीने आरोपी अर्जुन सोनीला पकडले. त्यांनी त्याला नायगाव स्टेशनवर खाली उतरवले आणि वसई रेल्वे पोलिसांकडे दिले. त्यानंतर हा गुन्हा वाळीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने आरोपीला पुढील तपासासाठी वाळीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रेमसंबंध आणि 'ओझे' वाटल्याने हत्येचा संशय

पोलीस तपासात या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांनुसार, आरोपी मामा अर्जुन सोनी आणि अल्पवयीन भाचीचे प्रेमसंबंध होते. पोलिसांच्या माहितीनुसार, "अल्पवयीन मुलगी आपल्या घरी न सांगता मामाकडे पळून गेली होती. मामाकडे आल्यावर, भाची आता आपल्यासाठी एक ओझे बनेल असं वाटल्याने मामाने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला."

अल्पवयीन मुलगी मुंबईतील मानखुर्द येथे आई आणि लहान भावासोबत राहत होती. तिची आई रुग्णांची देखभाल करण्याचे काम करते. शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर रविवारी मुलगी वाळीव येथील तिच्या धाकट्या मामाच्या घरी गेली असल्याचे कुटुंबीयांना समजले. तिला परत आणण्यासाठी तिची मोठी मावशी जेव्हा तिथे गेली, तेव्हा मुलगी पुन्हा बेपत्ता झाली. त्यामुळे कुटुंबियांनी वाळीव पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची  तक्रार दाखल केली.

सोमवारी आरोपी मामाने मुलीच्या आईला फोन करून भाची आपल्यासोबत असल्याचे सांगितले. आरोपी मामा भाचीला घेऊन भाईंदर स्टेशनवरून चर्चगेट-विरार लोकलमध्ये चढला आणि नायगावजवळ त्याने तिला ढकलून दिले. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी मुलीने तिच्या वडिलांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर काही काळातच तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर कोमलचे वसईला येणे-जाणे वाढले, याच दरम्यान ती तिच्या मामाच्या जवळ आली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

दरम्यान, अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर येथील टेंभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: 16 year old niece murdered by her uncle after being pushed from a moving local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.