पालघर जिल्ह्यात जोखमीच्या १,४०० माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:44 IST2025-01-20T07:44:33+5:302025-01-20T07:44:59+5:30
Palghar News: मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच, आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यात जोखमीच्या १,४०० माता
- हुसेन मेमन
जव्हार - मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच, आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या ३७६वर पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात हा आकडा १,४०० हून अधिक असल्याचे उघड होत आहे.
शरीरात रक्ताची कमतरता, जास्त खेपेच्या माता, सिझर झालेल्या माता, कमी उंची असलेली माता, १८ वर्षांखालील, ३५ वर्षांवरील माता, दुर्धर आजाराने ग्रस्त माता, टीबी, हृदयरोग, थायरॉइड असे आजार असलेल्या मातांना जोखमीच्या माता म्हटले जाते. यामुळे महिलांच्या आरोग्याविषयी सजगता बाळगायला हवी.
टास्क फोर्स काय करते?
उघड झालेला आकडा डिसेंबरअखेरपर्यंतचा असल्याने आगामी काही महिन्यातच या महिलांची सुखरूप प्रसूती होणे, बाळसुद्धा सुखरूप राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील मातामृत्यूचे दृष्टचक्र थांबवणे गरजेचे आहे. यासाठी सावध व्हावे लागणार आहे. जव्हार येथे आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा झाला यावेळी अनेक महिला वेळेवर तपासणी करत नसल्याचे त्यांना दिसून आले. दरवर्षी टास्क फोर्स निर्माण होतो, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही काय होते? हा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा रुग्णालयात हेळसांड
आजही येथील मातेला बालकाला आयसीयू मिळवण्यासाठी किमान ७० ते १०० किमीचा प्रवास करावा लागतो. जिकिरीच्या रुग्णाला उपचार देऊ शकेल अशी यंत्रणा येथे कार्यान्वित नाही. जिथे पाठवले जाते त्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते, असा आरोप रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करतात. अशा स्थितीत जोखमीच्या माता असणे हे त्याहीपेक्षा भयावह असल्याने या मातांची प्रसूती सुखरूप करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
जोखमीच्या मातांकडे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असते. ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचा समन्वय साधून अशा मातांची सुखरूप प्रसूती केली जाते.
- भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, मोखाडा