वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 12:00 PM2021-05-13T12:00:55+5:302021-05-13T12:01:45+5:30

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली.

100 Kovid rickshaw ambulances in Vasai, 10 additional vaccination centers | वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

Next

वसई : वसई-विरारमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, बाधित रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने १०० कोविड ऑटो रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे घरीच विलगीकरण करणे शक्य नसेल, अशा रुग्णांना रुग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी कोविड रिक्षा रुग्णवाहिकांची सुविधा शहरात करण्याच्या सूचना प्रभारी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिल्या आहेत.

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्यावर आजवर केलेल्या उपाययोजना व पुढील करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेला ऑक्सिजन पुरवठा करणे, रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा करणे, कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणे आदीबाबतीत महापालिकेला प्राधान्य देण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस उपस्थित पोलीस उप-आयुक्तांशी शहरातील गर्दीच्या ठिकाणी कडक उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या महापालिका अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त, सहा. आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी, इतर वैद्यकीय अधिकारी व विभागप्रमुखांसोबत प्रभारी आयुक्तांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. दरम्यान, नागरिकांना सुरळीतपणे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुविधा मिळावी यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असून प्रत्येक प्रभागात किमान १० लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. यापैकी दोन लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना प्रथमप्राधान्य देण्यात येईल, असेही या आढावा बैठकीत आयुक्तांनी जाहीर केले. दरम्यान, बाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेची वेबसाईट लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

त्वरित होतील उपलब्ध
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत प्रभागनिहाय १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका सर्वत्र उपलब्ध केल्या जाणार आहेत. जेणेकरून रुग्णांची त्वरित ने-आण करणे शक्य होईल. तसेच सदर रिक्षा गल्ली-बोळाच्या ठिकाणी, लहान रस्ते असणाऱ्या ठिकाणीही सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतील, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

Web Title: 100 Kovid rickshaw ambulances in Vasai, 10 additional vaccination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.