रिडिंग घेत मिळणार कागदावरील विद्युत देयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:11+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक ग्राहकांनी प्रतिसाद देत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून देयकही अदा केले.

रिडिंग घेत मिळणार कागदावरील विद्युत देयक
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरोघरी जाऊन मिटर रिडिंग घेण्यासह कागदी विद्युत देयक देण्याच्या विषयाला ब्रेक लागला होता. त्यानंतर ग्राहकांची होणारी फरपट व महावितरणचे होणारे नुकसान लक्षात घेऊन वर्धा जिल्हा प्रशासनाने मिटर रिडिंगसह कागदी विद्युत देयक वितरण करण्याच्या विषयाला हिरवीझेंडी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक ग्राहकांनी प्रतिसाद देत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून देयकही अदा केले. परंतु, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांच्यासाठी ही प्रक्रिया किचकट आणि अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे लक्षात आल्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कागदी देयक वितरणासह घरोघरी जाऊन मिटर वाचनाबाबतची परवानगी मागितली. महावितरणच्या विनंतीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी त्याला हिरवीझेंडी दिल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ४.५८ लाख ग्राहक
वर्धा जिल्ह्यातील ४ लाख ५८ हजार ७४५ कुटुंबाला महावितरण कंपनी विद्युत पुरवठा करते. कागदी विद्युत वितरणासह विद्युत मिटर वाचनावर बंदी आल्यावर एप्रिल महिन्यात ३३ हजार ४४९ ग्राहकांनी आॅनलाईन पद्धतीचा वापर करून विद्युत देयकाची एकूण ३ कोटी ७३ लाख ३३ हजार ५२१ रुपयांची रक्कम महावितरणकडे अदा केली आहे. तर मे महिन्यात ४० हजार ६८२ ग्राहकांनी ६ कोटी ८ लाख २८ हजार १६२ रुपयांची रक्कम अदा केल्याचे सांगण्यात आले.
मिटर वाचनासह कागदी विद्युत देयक वितरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याने ग्राहकांना आता सरासरी देयक न देता इंत्यभूत देयक दिली जाणार आहे. त्यामुळे विद्युत देयकाच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. शिवाय प्रत्येक्ष मिटर वाचनासह कागदी देयक वितरणाचे काम येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होईल.
- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.
या प्रमुख अटींचे करावे लागेल पालन
रिडिंग धारकांचे त्यांचेकडे असलेले वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. तसेच मिटर वाचन करणाºयाला सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करूनच हे काम करावे लागणार आहे.
प्रत्येक १५ दिवसांनी सदर कर्मचाऱ्याला आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
संबंधित व्यक्तीला जिल्ह्याबाहेर ये-जा करण्यास प्रतिबंध राहणार आहे.
मिटर वाचन व विद्युत देयक वितरीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य राहणार आहे.
सदर व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास त्याला त्याची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.