वर्ध्यात महिलेने दिला तिळ्यांना जन्म 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:03 IST2018-09-03T14:03:26+5:302018-09-03T14:03:56+5:30

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

woman deliverd triplets in Wardha | वर्ध्यात महिलेने दिला तिळ्यांना जन्म 

वर्ध्यात महिलेने दिला तिळ्यांना जन्म 

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: एका महिलेने एकाच वेळी दोन मुलांना जन्म देणे हा विषय सध्याच्या विज्ञान युगात नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा राहिलेला नाही. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही या रुग्णालयातील पहिलीच घटना असल्याने सदर विषय रुग्णालयात चांगलाच चर्चिला जात आहे.
वर्धा शहरातील पुलफैल येथील इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिलेला तिच्या कुटुंबियांनी प्रसूतीसाठी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करताच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या महिलेने त्याच दिवशी सकाळी ११.५२ वाजता १.२ किलो, ११.५८ वाजता ०.९५० किलो व दुपारी १२ वाजता ०.९८० किलो वजनाच्या तीन मुलांना जन्म दिला. नुकतेच जन्मलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे वजन थोडे कमी असल्याने डॉक्टरांच्या निदर्शनास येताच या मातेसह तिच्या तिन्ही मुलांची विशेष काळजी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली. परंतु, रविवारी या तिन्ही नवजात बालकांची शुगर वाढत असल्याचे व त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास येताच सदर मातेसह मुलांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितले. सदर महिलेची प्रसूती योग्य पद्धतीने व्हावी तसेच नुकत्याच जन्मलेल्या बाळांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अनुपम हिवलेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनिषा नासरे, डॉ. प्राजक्ता चिंदालोरे, डॉ. सोनी सिंग, डॉ. मारीया खातून, डॉ. प्रियंका तळवेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे, डॉ. अमोल येळणे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिला प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. तिने येथे तिळ्या मुलांना जन्म दिला. नवजात बालक हे सुरूवातीला २४ तास अगदी व्यवस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मातेचे व मुलांचे आरोग्य व्यवस्थित आहे.
- डॉ. अनुपम हिवलेकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: woman deliverd triplets in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य