‘भंगार’ वाहने पुन्हा रस्त्यावर धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:09+5:30

दारूतस्करीसह विविध गंभीर गुन्ह्यात वापरलेले दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात कित्येक वर्षांपासून धूळखात पडले होते. ही वाहने सोडविण्याकरिता मागील दहा ते पंधरा वर्षांत कोणीही पुढे आले नसल्याने पोलिस विभागाकडून सर्व वाहनांचा लिलाव केला. शहर ठाण्यातील जवळपास ४०० वाहनांचा लिलाव करण्यात आला.

Will 'wrecked' vehicles run on the road again? | ‘भंगार’ वाहने पुन्हा रस्त्यावर धावणार?

‘भंगार’ वाहने पुन्हा रस्त्यावर धावणार?

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील ४७० वाहनांचा लिलाव : ऑटो डिलरकडून मोठ्याप्रमाणात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर आणि सेवाग्राम पोलीस ठाण्याकडून नुकताच भंगार वाहनांचा लिलाव करण्यात आला. यातील ४७० वाहनांच्या लिलावातून पोलिस विभागाला १२ लाख ५६ हजार रुपयांचा महसूल मिळाला. लिलावातील ही भंगार वाहने पुन्हा रस्त्यावर वापरू नये, अशी अट असल्याने पोलिस विभागाकडून या वाहनांचे इजिंन आणि चेसीस क्रमांक मिटविले आहे. पण, ही वाहने मोठ्या प्रमाणात आॅटो डिलरकडून खरेदी करण्यात आल्याने ती वाहने पुन्हा रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.
दारूतस्करीसह विविध गंभीर गुन्ह्यात वापरलेले दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात कित्येक वर्षांपासून धूळखात पडले होते. ही वाहने सोडविण्याकरिता मागील दहा ते पंधरा वर्षांत कोणीही पुढे आले नसल्याने पोलिस विभागाकडून सर्व वाहनांचा लिलाव केला. शहर ठाण्यातील जवळपास ४०० वाहनांचा लिलाव करण्यात आला. दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. त्यामध्ये ऑटो डिलरचीच गर्दी जास्त असल्याने बहुसंख्य वाहनांची त्यांनीच खरेदी केल्याची चर्चा आहे. या वाहनांच्या लिलावातून शहर पोलीस ठाण्याला ११ लाख ३० हजार रुपयांचा महसूल मिळाला. पोलिसांनी ही सर्व वाहने भंगार म्हणून विकले असून ती वाहने कोणालाही विकू नये आणि पुन्हा रस्त्यावर आणू नये, असे निर्देशित केले आहे. मात्र ऑटो डिलर ही वाहने पुन्हा जादा दरात दारूविक्रेत्यांना विकणार नाही याची हमी कोण घेणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

सेवाग्रामच्या ७० वाहनांचा सहभाग
सेवाग्राम पोलिस ठाण्यातही विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या ७० वाहनांचा लिलाव करण्यात आला. यामध्ये दुचाकी आणि काही चारचाकींचा समावेश होता. यामधून सेवाग्राम पोलीस ठाण्याला १ लाख २६ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील काही वाहने १० वर्षे जुनी असल्याने त्यांचे रजिस्ट्रेशन बाद झालेले आहे. त्यामुळे ती वाहने दोन भागात तोडून भंगार म्हणून विकण्यात आली.

शहर ठाण्यातील लिलाव प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
सेवाग्राम ठाण्याप्रमाणे शहर पोलिसांनीही भंगार वाहनाचे दोन भाग करुन विकणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता दहा ते पंधरा वर्षे जुन्या असलेल्या वाहनांचा लिलाव केला आहे. बहुतांश वाहने ऑटो डिलरने खरेदी केली आहेत. त्यामुळे ती वाहने पुन्हा रस्त्यावर धावणार नाहीत, याची जबाबदारी कोण घेणार? काही वाहने जिल्ह्याबाहेरही विकल्यास त्यावर पोलिस कसे नियंत्रण ठेवणार? असा प्रश्न उपस्थित होत असून शहर पोलिसांच्या लिलाव प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जी वाहने १० ते १५ वर्षे जुनी आहेत. तसेच ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन बाद झाले आहे, अशा सर्व दुचाकींचे दोन भाग करून भंगार म्हणून विकले आहेत. चारचाकींचे इंजिन क्रमांक आणि चेसीस क्रमांक मिटवून त्या पुन्हा रस्त्यावर धावणार नाही, असे निर्देश खरेदीदारांना दिले आहे.
कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम

लिलावातील वाहने पुन्हा रस्त्यावर धावता कामा नये, असे निर्देश लिलाव प्रक्रि येत सहभागी खरेदीदारांना दिले. त्यानुसारच लिलाव झाला असला तरीही वाहने रस्त्यावर धावणार नाही, याची हमी कोण घेणार, हा प्रश्नच आहे.

Web Title: Will 'wrecked' vehicles run on the road again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस